अद्वैत दादरकर या अष्टपैलू कलाकाराला, एक उत्तम दिग्दर्शक म्हणून, अभिनेता म्हणून, एवढंच नाही तर लेखक म्हणून सुद्धा अनेकवेळा पाहिलेलं आहे. हा अष्टपैलू, गुणी कलाकार, झी युवा वरील ११ डिसेंबरपासून रात्री ९.३० वाजता सुरु होणाऱ्या ‘युवा डान्सिंग क्वीन’ या कार्यक्रमात सूत्रसंचालन करताना पाहायला मिळणार आहे. त्यानिमित्ताने त्याच्याशी केलेली ही खास बातचीत.

१. तू एक अष्टपैलू कलाकार आहेस. तुझ्यासाठी अभिनय, दिग्दर्शन आणि लेखन यातील सर्वात आव्हानात्मक गोष्ट काय आहे?
लेखन मला सर्वात जास्त आव्हानात्मक वाटतं, कारण ती एकट्याने करायची प्रोसेस आहे.

२.तुला स्वतःला नृत्यकला आवडते का??
मला सगळ्याच कला आवडतात आणि प्रत्येक कलेबद्दल आदर आहे. मी स्वतः अतिशय वाईट डान्सर असल्याने ज्यांना उत्तम नृत्य जमतं त्यांच्या बद्दल जास्त आदर आहे.

३.सूत्रसंचालकाच्या भूमिकेत तू यापुढे दिसणार आहेस? त्याविषयी काय सांगशील?
मी ‘झी मराठी’च्या काही इव्हेन्ट्सचं, बक्षीस समारंभ वगैरे कार्यक्रमांचं सूत्रसंचालन केलेलं आहे. मुळात मला गप्पा मारायला आवडतात, त्यामुळे प्रत्येकाशी संवाद साधून कार्यक्रम पुढे नेणं, तो रंगतदार करणं ही जबाबदारी मी पार पाडू शकेन असं वाटतंय.

४. सोनाली कुलकर्णी आणि मयूर वैद्य यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा आहे?
मी सोनालीबरोबर काम केलेलं नाही. पण अप्सरा आली ह्या गाण्यातील सादरीकरण पाहिल्यापासून मी तिचा फॅन आहे. ती खूपच कमाल डान्सर आहे. मयुरने माझ्या २ नाटकाचं नृत्यदिग्दर्शन केलं आहे. तो स्वतः उत्तम डान्सर आहेच पण त्याची नृत्यकलेची समज, अभ्यास अफाट आहे. त्याच्या एनर्जीला तोड नाही.

५.स्पर्धकांसोबतचे तुझे नाते कसे आहे?
काही स्पर्धकांना मी ओळखतो, तर काहींशी अजून ओळख झालेली नाही. त्यामुळे आता हळूहळू नाती निर्माण होत जातील. जी मैत्री आहे, ती घट्ट होत जाईल.

६.’युवा डान्सिंग क्वीन’ या कार्यक्रमाविषयी तुझ्या चाहत्यांना आणि प्रेक्षकांना काय सांगशील?
निर्माते संतोष कोल्हे, झी युवा क्रिएटिव्ह टीम, आणि लेखक चिन्मय कुलकर्णी यांनी कार्यक्रम खूप सुंदर डिझाईन केला आहे. उत्तम स्पर्धक आणि त्यांचे परफॉर्मन्स बघायला मिळणारच आहेत. त्याचबरोबर काही मसाला सुद्धा आहे. एकूणच उत्तम मनोरंजन करणारा हा शो असेल. त्यामुळे प्रेक्षकांना तो नक्की आवडेल. आवर्जून हा कार्यक्रम प्रेक्षकांनी पहावा.