किल्ले रायगड वर चालू असलेल्या संवर्धनाच्या कामांचा सविस्तर आढावा घेतला.
कारण, यावर्षी महाराष्ट्राप्रमाणेच गडावरही प्रचंड पाऊस झाला. मागच्या वर्षांत झालेल्या कामांचा खरा कस यंदाच्या पाऊसाळ्यात लागणार होता. ती फार मोठी परीक्षा होती आपल्या सर्वांच्यासाठी.
सर्व शिवभक्तांना एक गोष्ट आनंदाने सांगू इच्छितो की प्राधिकरणाच्या कामांमध्ये अत्यंत कमी उणिवा राहिल्या आहेत.
काम एकदम चोख पणे सुरू आहे. एवढ्या पाऊसातही आपण बांधलेल्या पायऱ्या सुरक्षित राहिल्या आहेत. पाण्याचे नैसर्गिक प्रवाह लक्षात घेऊन जागोजागी फरसबंदी आणि पायऱ्याच्या खालून वाट करून दिली होती. फक्त एक किंवा दोन जागीच फरसबंदीच्या वरून पाणी वाहिले असेल. त्या जागा शोधल्या आहेत. आणि तिथे नव्याने काम होईल. याचा अर्थ तिथे काम निकृष्ट झाले असे नाही. पण पाण्याचा कोणताही प्रवाह अडवला जाणार नाही याची खबरदारी घेत आहोत.
उत्खननाची कामे व्यवस्थित प्रकारे चालू झाली आहेत. ही कामे प्रामुख्याने पुरातत्व खाते करते. प्राधिकरण सुद्धा यापुढे शास्त्रीय पद्धतीने उत्खनन करेल. जेणेकरून कामांचा वेग वाढेल. हेच काम महाराष्ट्राचा इतिहास नव्याने लिहिण्यास भाग पाडेल.
आता पाऊसकाळ जवळपास संपलेला आहे. पुढच्या पावसाळ्यापर्यंत जास्तीतजास्त कामे करून घेण्याचा मानस आहे. मागचे चार महिने जरी गडावर कामे होत नसली तरी, कागदोपत्री परवानग्या तसेच पुढे 8 महिने करावयाच्या कामांचे नियोजन केलेलं आहे.
माझा हाच आग्रह आहे, की मिळालेल्या प्रत्येक क्षणाचा उपयोग करून रायगडावर उत्तमोत्तम कामे करून घ्यायची. प्राधिकरणाच्या कामांची पद्धत वापरून महाराष्ट्रातील आणखीही किल्ल्यांचे जतन आणि संवर्धन करायचे आहे.
अध्यक्ष
रायगड विकास प्राधिकरण.