पुणे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट चे पदवीधर असणारे बंगलोरचे डॉक्टर रमेश कामथ यांनी कोकणी भाषेतील ‘जाना माना ‘ आणि ‘आ वै जा सा ‘ हे यशस्वी चित्रपट दिले आहेत. ‘बेटी बचाओ बेटी पढाओ ‘ या विषयावर आधारित ‘अप्सरा धारा ‘ हा त्यांचा सध्याचा चित्रपट चर्चेचा विषय ठरला आहे .चित्रपटाची कथा ,पटकथा आणि दिग्दर्शन हे डॉक्टर रमेश कामथ यांचे आहे.

मंगलोर येथील मास्टर सार्थक शेणॉय आणि कुमारी स्वाती भट या गुणीबालकलाकारांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. बंगलोर चे सुप्रसिद्ध व्यावसायिक उद्योजक आणि दानशूर असणारे डॉक्टर दयानंद पै यांनी या चित्रपटात ‘दयानंद’ ही एक खास भूमिका केली आहे . ”अप्सरा धारा ‘ हा इजिप्त मध्ये चित्रित झालेला पहिला कोकणी चित्रपट आहे आणि यात काही थ्री डी दृश्येही चित्रित केली आहेत . ‘यशाला कधीच शॉर्टकट नसतो ‘, असा संदेश अधोरेखित करणारा हा चित्रपट मुलांसाठी आणि पालकांसाठी प्रेरणादायी चित्रपट ठरणार आहे .

बहुभाषिक चित्रपट कलावंत गोपीनाथ भट हे या चित्रपटात ग्राम प्रमुखाची भूमिका करत आहेत आणि सुप्रसिद्ध नाट्य कलावंत पी रोहिदास नायक हे आदर्श शिक्षक ‘पिंटो ‘ ही व्यक्तिरेखा साकारत आहेत. दगडाचे सोन्यात रूपांतर करणाऱ्या परिकथेचा रहस्यमय घटक सुद्धा या चित्रपटात तुम्हाला आनंद देणार आहे.

हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होण्याआधीच या चित्रपटाची निवड कोलकता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील ‘बाल चित्रपट ‘विभागासाठी झाली आहे आणि हा चित्रपट बालदिनाच्या निमित्ताने १४ नोव्हेंबरला दाखवला जाणार आहे.