“एक नगर होतं, तिथे एक होता राजा आणि एक होती राणी”… अत्यंत निरागस, अवखळ, आपल्या विश्वात रमणारी अशी मुलगी… एका देखण्या, रुबाबदार अशा राजाच्या ती बघताच क्षणी प्रेमात पडली… आणि तिथून सुरू झाली राजा – राणीची गोष्ट… अशा अनेक गोष्टी आपण सगळे लहानपणापासून ऐकत आलो आहोत. पण, आपल्या कथेतील राजा – राणीची गोष्ट आणि त्यांचा प्रवास या सगळ्यांहून जरा वेगळाच आहे असे म्हणावे लागेल… रेशीमबंधांच्या गाठी स्वर्गातच बांधलेल्या असतात म्हणे… अगदी खरं आहे ! नशिबाचे खेळ निराळे, अनभिज्ञ असतात… जे जगात शोधत असतो ते आपल्याच दारात असतं… थंड वाऱ्याची झुळूक यावी, पौर्णिमेच्या प्रकाशात चांदण हसावं इतक्या सहज ती व्यक्ती समोर येते आणि मनात तरंग उठतात. अचानक ही भावना देणारी व्यक्ती कधी खोडकर, अवखळ,प्रेमळ अशी असते. कधी संघर्षातून, द्वेषातून प्रेमाचे अंकुर फुटतात, तर कधी विरुद्ध स्वभावातून… परमेश्वराने जोडललेल्या जन्मभराच्या या रेशीमगाठी बहुतांश विजोडच असतात. परस्परविरोधी स्वभावाच्या व्यक्ति कधीच एकत्र येऊ शकत नाही तर त्या संसार कसा बरं करू शकतील ? हा प्रश्न आपल्याला नेहमीच पडतो. सत्यात अशाच दोन व्यक्ति एकमेकांच्या प्रेमात पडतात. कारण प्रेम आणि विश्वास या जगातील अशा दोन गोष्टी आहेत ज्या अशक्य देखील शक्य करून दाखवतात. आयुष्य म्हटलं की, नाते संबंधांची कसोटी ही आलीच. ही कसोटी अग्नीवर तावून सुलाखून निघणार्या सोन्यासारखी असते. प्रतिकूल परिस्थितीत नात्यांची कसोटी नात्यातील ऋणानुबंधाचे धागे मजबूत करते. असंच एक नातं जुळतं जेंव्हा अवखळ, गावात वाढलेली, हिरव्यागार रानात रमलेली संजीवनी रणजीतला भेटते. यानंतर तिच्या आयुष्याला एक वेगळीच कलाटणी मिळते… आपल्याच माणसाने घेतलेल्या एका निर्णयामुळे फुलपाखरासारखे आयुष्य जगणार्या संजीवनीसमोर अनेक प्रश्न उभे राहतात. काय घडतं संजीवनी – रणजीतच्या गोष्टीमध्ये जाणून घेण्यासाठी नक्की बघा ‘राजा रानीची गं जोडी’ १८ डिसेंबर पासून सोम ते शनि संध्या ७.०० वा. आपल्या कलर्स मराठीवर. चिन्मय मांडलेकर यांनी लिहिलेल्या या कथेची निर्मिती पोतडी प्रॉडक्शन्सने केली आहे. मालिकेचे विशेष म्हणजे संपूर्ण मालिका सांगलीमध्ये शूट होणार आहे. शिवानी सोनार संजीवनीची भूमिका आणि नवोदित मनीराज पवार रणजीतची भूमिका साकारणार आहे. ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी गोखले देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
सांगलीमधील एका छोट्या गावामध्ये मध्यम वर्गीय घरामध्ये वाढलेली संजीवनी इतरांना आनंद कसा देता येईल याच प्रयत्नात असते. खोटं बोलण्याने जर दुसर्यांचे चांगले होत असेल तर काहीच हरकत नाही हे संजीवनीच्या जगण्याचे सूत्र आहे. तर दुसर्या बाजूला शिस्तप्रिय, धडाडीचा आणि कर्तव्यनिष्ठ असा रणजीत ज्याला खोट्याचा तिटकारा आहे. असे अतिशय भिन्न स्वभावाचे संजीवनी आणि रणजीत लग्नाच्या पवित्र बंधनात बांधले जातात… शहराच्या कोलाहलात, मेट्रो मॉलच्या संस्कृतीत, दिखाऊपणाची नाती फार काळ साथसोबत करत नाहीत. पण निसर्गाच्या कुशीत, गावातील कसदार मातीत नाते संबंधाची मुळं रुजतात ती आयुष्यभर सोबत करतात. मातीच्या गंधापरी, संस्कारांची कास धरून संगत करतात. अवखळ निरागस ही नाती प्रत्येक संघर्षात, कसोटीला खरी उतरतात. असे काहीसे संजीवनी आणि रणजीतचे आहे… आलेल्या अडचणींना पार करत संजीवनी कसा राजा राणीचा संसार करेल ? एकमेकांबद्दल असं कुठलं सत्य आहे जे दोघांना माहिती नाही ? हे लवकरच प्रेक्षकांना कळणार आहे राजा रानीची गं जोडी या मालिकेमध्ये…
मालिकेबद्दल बोलताना प्रमुख – मराठी टेलिव्हीजन, वायाकॉम18 चे दीपक राजाध्यक्ष म्हणाले, “गेल्या वर्षभरापासून वेगवगेळ्या धाटणीचे कार्यक्रम प्रेक्षकांना देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. कलर्स मराठीद्वारे आम्ही मागील वर्षी “जीव झाला येडापिसा” ही रांगडी प्रेमकहाणी रसिक प्रेक्षकांच्या भेटीस आणली, ग्रामीण महाराष्ट्राच्या पाश्वर्भूमीवर आधारित या मालिकेची मांडणी आणि चित्रीकरणामुळे प्रेक्षकांना ती आपलीशी वाटते आहे. आणि आता “राजा रानीची गं जोडी” ही अस्सल ग्रामीण प्रेमाचा बाज असलेली प्रेमकथा आम्ही घेऊन येत आहोत. मालिकेद्वारे अतिशय नाजूक विषयाला हाताळण्याचा प्रयत्न केला आहे. नायिकेचा संघर्ष आणि त्याला मिळणारी नायकाची खंबीर साथ हे “राजा रानीची गं जोडी” या मालिकेमधून प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. मालिकेद्वारे शिवानी सोनार आणि मनीराज पवार यांची फ्रेश जोडी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अनुभवी कलाकारांचा संच, अनोखी कथा, रियल लोकेशन्स यामुळे आम्ही आशा करतो की मालिका प्रेक्षकांना आवडेल”. राजा रानीची गं जोडी मालिकेच्या निमित्ताने प्राईमटाईम बँडमध्ये काही महत्वाचे बदल करण्यात आले आहेत आणि त्यामुळे हा बॅंड मजबूत होईल अशी आम्हांला खात्री आहे”.
मालिकेचे निर्माते आणि दिग्दर्शक विनोद लव्हेकर म्हणाले, “ही राजा – राणीची” गोष्ट आहे… जशी जीव झाला येडापिसा समज – गैरसमजाची गोष्ट आहे, तशी ही गोष्ट सत्य – असत्याची लढाई आहे. सत्य – असत्य हे सापेक्ष असतं. आपण जसं त्याच्याकडे बघतो तसं ते बदलतं. राजा रानीची गं जोडी मालिकेमध्ये संजीवनी ही अतिशय अल्लड मुलगी आहे जिची खूप साधी स्वप्नं आहेत. संजीवनीला अत्यंत लहान वयात जीवनाची खूप मोठी लढाई लढावी लागणार आहे याचा तिला अंदाज नाहीये. स्वत:ला सांभाळताना ती संपूर्ण कुटुंबाचा आधार कशी होते हे प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. संसारामध्ये तुम्ही एकमेकांच्या चांगुलपणावर किती विश्वास ठेवता, कितीही संकट आली तरी देखील एकमेकांवर विश्वास ठेऊन संसार कसा निभावता हे महत्वाचे असते. मालिकेमध्ये संजीवनी आणि रणजीतवर देखील संकट येणार आहेत आणि त्या परिस्थितीत आपली तत्व सांभाळत ते कशी एकमेकांना साथ देतात त्याची ही गोष्ट आहे”.
चिन्मय मांडलेकर म्हणाला, “राजा रानीची गं जोडी ही रणजीत आणि संजीवनी ची प्रेमकथा आहे. एक अशी प्रेमकथा ज्याची सुरुवात अपघाताने होते. या कथेची गंमत अशी आहे की, यामध्ये दोन गुपित आहेत. एकमेकांवर खूप प्रेम करणारी माणसं, एकमेकांना जपणारी माणसं ही दोन गुपित जपता जपता त्यांच्या नात्यामध्ये तारेवरची कसरत कशी होते याची कहाणी म्हणजे ही मालिका”.
एक सागर तर एक आकाश… मीलन झालंच तर क्षितिजावर तेही मृगजळासारखं फक्त भासणारं… कधी स्वप्नात देखील ज्याचा विचार केला नसेल अशा व्यक्तीशी साताजन्माचे नाते जोडले गेले… दैवाने हसत संजीवनीचा हात रणजीतच्या हाती दिला खरा पण हा निर्णय त्याचं आयुष्य उध्वस्त करील की तेजाने उजळेल हे नियतीच ठरवेल. हे दोघे कसे नियतीवर मात करून राजा – राणीचा संसार करतील ? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे… नक्की पाहा संजीवनी – रणजीतची जगावेगळी प्रेमकथा ‘राजा रानीची गं जोडी’ १८ डिसेंबर पासून सोम ते शनि संध्या ७.०० वा. आपल्या कलर्स मराठीवर.