तरुण मुलं-मुली पिंपल्स सारख्या सामान्य समस्या नेहमी अनुभवतात. खरंतर सर्वच वयोगटातील लोकांना ह्याचा त्रास कधीना कधी होतो. शरीरातील हार्मोनल बदलांमुळे किंवा आपल्या त्वचेचे छिद्र अशुद्धतेने भरून बंद झाल्यामुळे होत असतात. चला तर थोडक्यात जाणून घेऊ ह्यावरच्या उपायांबद्दल.

का होतात पिंपल्स?

आपल्या त्वचेत तेल उत्पादक ग्रंथी असतात ज्याला सेबेशियस ग्रंथी म्हणतात. कधीकधी, जेव्हा ह्या ग्रंथी भरुन जातात. हार्मोन्समध्ये होणारे बदल, धूळ ह्यांसारखी अनेक कारणे ह्या मागे असू शकतात. बंद झालेल्या ह्या ग्रंथी पूमुळे भरलेल्या जखमांसाठी कारणीभूत ठरतात. हे घाव फुगले जाऊ शकतात आणि लालसर दिसतात आणि त्यांना पिंपल्स म्हणतात.

चेहरा, पाठ, खांदे आणि छातीवर सेबेशियस ग्रंथी मोठ्या प्रमाणात आढळतात. त्यामुळे ह्या भागांवर पिंपल्स जास्त पाहायला मिळतात. पिंपल्स कोणत्याही वयात उद्भवू शकतात परंतु हार्मोनल बदलांमुळे तारुण्यात मोठ्या प्रमाणात दिसून येऊ शकतात. म्हणून ह्याला तारुण्यपिटीका देखील म्हणतात.

पिंपल्स कमी करण्यासाठी घरगुती उपचार

एरंडेल तेल

एरंडेल तेलाचा मुख्य घटक रिकाइनोलिक ऍसिड आहे, ह्यात एंटी-इंफ्लेमेटरी आणि एंटीमाइक्रोबियल गुण असतात. हे गुणधर्म पिंपल्सच्या सभोवतालची जळजळ आणि संक्रमण कमी करण्यास मदत करू शकतात. एरंडेल तेलामुळे त्वचेच्या काही भागात खाज निर्माण होऊ शकते. त्यामुळे ह्याच्या वापराआधी पॅच टेस्ट करावी.

कसे वापराल?

चेहरा साफ करण्यासाठी थोडेसे पाणी उकळून त्याची वाफ घ्या. एरंडेल तेल आणि ऑलिव्ह ऑईलचे मिश्रण तोंडावर लावून ते वाळवा. हा लेप रात्रभर ठेवू शकता. आठवड्यातून दोनदा ह्याचा वापर पिंपल्स कमी करण्यास मदत करतो.

फिश ऑइल

फिश ऑइलमध्ये ओमेगा -3 फॅटी ऍसिड असते. हे एंटी-इंफ्लेमेटरी तत्वाचे तेल पिंपल्समुळे होणारी सूज आणि तेल ग्रंथींनी तेलाचे स्राव कमी करण्यास मदत करते.

नारळाचे तेल

नारळाच्या तेलामध्ये वेदनशामक गुणधर्म असतात. हे वेदना आणि जळजळ कमी करण्यास मदत करतात. नारळ तेलामध्ये लॉरिक ऍसिड नावाचे रसायन असते. हे अँटी-मायक्रोबियल असते. जे पिंपल्स कमी करण्यास मदत करू शकते. तुमची त्वचा तेलकट असल्यास नारळ तेलाचा वापर टाळा कारण ते अत्यंत कॉमेडोजेनिक आहे आणि छिद्रांना बंद करू शकते.

लसूण

लसूणमध्ये अ‍ॅलिसिन नावाचे अँटी-मायक्रोबियल रसायन असते. हे पिंपल्सच्या सभोवतालचे संक्रमण कमी करण्यात आणि वारंवार पिंपल्स फुटणे टाळण्यास मदत करते. जास्त दिवस लसूण वापरल्यास त्वचेची जळजळ होऊ शकते आणि त्वचेचे नुकसान होऊ शकते.

कसे वापराल?

4-5 लसूण पाकळ्या आणि ऑलिव्ह ऑईल गरम करून ते तेल गाळून घ्या. कापसाच्या बोळ्याने पिंपल्सवर लावा. 20 मिनिटानंतर पाण्याने चेहरा धुवून घ्या. दिवसातून दोन वेळा असे केल्याने आराम मिळतो.

कोरफड

फार पूर्वीपासून कोरफडीचा वापर त्वचेच्या विकारांवर केला जात आहे. कोरफड मध्ये अँटीमाइक्रोबियल गुणधर्म आहेत. कोरफडीचे आरोग्यदायी फायदे ह्या पूर्वीच्या लेखात कोरफडीचा वापर कसा करावा हे दिले आहे.

मध

मधात अँटी-बॅक्टेरीयल गुणधर्म असतात. पिंपल्ससाठी कारणीभूत बॅक्टेरिया कमी करण्यात ह्याची मदत होऊ शकते. दिवसातून 2-3 वेळा ह्याचा वापर पिंपल्स कमी करण्यास मदत करतो.

-भक्ती संदिप
(Microbiologist in Foodvibes Grocers)