मित्रांनो!, विमानप्रवास… हवाईयात्रा हे आपणां सर्वांचेच स्वप्नं असते. दैवकृपेने मिळालेल्या या मनुष्य जन्मात आपण एकदातरी विमानवारी करावीच असे आपल्याला कायम वाटत असते. अर्थात आताच्या या मॉडर्न युगात हे बहुतेकांना सहजसाध्य झाले आहे म्हणा. असो… तर तुम्ही कधी विमान प्रवास केलाय का ? विमानामध्ये एक मुख्य पायलट, दुसरा को-पायलट असतात हे आपल्या पैकी बहुतेकांना ज्ञात असेलच. आणि विमानातील प्रमुख आकर्षण असलेल्या हवाई सुंदरींबद्दलचे अनेक रंजक किस्से हे तुम्ही तुमच्या विमानवारी केलेल्या मित्रमंडळींकडून कधीतरी नक्कीच ऐकले असतील. हो ना?

या हवाईयात्रेबद्दल, विमानतळ, विमानोड्डाण, विमानलँडिंग आणि मुख्य म्हणजे विमानप्रवासाच्या दरम्यान, या विमानाच्या बाबतीत अनेक मनोरंजक गोष्टी आहेत, ज्या आजपर्यंत तुम्ही कधी वाचल्या किंवा ऐकल्या नसतील. ज्या आज या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला तर मग, जाणून घेऊयात काही रंजक गोष्टी…


विमानप्रवासात विमानचालकांना म्हणजेच पायलट आणि को-पायलटला एकसारखे जेवण दिले जात नाही. होय!, हे खरे आहे. तसे पाहायला गेलं तर पायलट आणि को-पायलटला एकसारखे जेवण न देण्यामागचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे, जर समजा त्या दोघांना एकसारखेच पदार्थ जेवणात दिले आणि त्या खाद्यपदार्थामध्ये काही गडबड असेल व त्यामुळे ते खाल्ल्यास एकाचवेळी दोन्ही पायलटची तब्येत बिघडू शकते.

आणि अशावेळेस गंभीर परिस्थिती निर्माण होऊन दोघांनाही उपचाराची गरज निर्माण होईल. अशा स्थितीमध्ये विमान चालविणार कोण? त्या दोघांच्या जीवितास तर धोका निर्माण होऊ शकतोच परंतु विमानातील प्रवाशांच्या जीवासाठी हा धोका आहे. हे टाळण्यासाठी दोन्ही पायलट व को-पायलट यांचा जेवणाचा मेन्यू वेगवगेळे असतात.

या विमान प्रवासाबाबत आणखी काही रंजक आणि माहितीपूर्ण गोष्टी सांगायच्या झाल्यास बीबीसीच्या एका रिपोर्ट अनुसार विमानातुन प्रवास करत असताना लोक अधिक प्रमाणात गॅस सोडत असतात. त्यामुळे विमानात दुर्गंधी पसरू शकते. हे होऊ नये म्हणून विमानात कोळशाचे फिल्टर वापरले जातात.विमानातुन प्रवास करत असताना आपल्या जेवणाचा स्वाद बदलत असतो.

या मागचे कारण म्हणजे विमानातल्या जेवणामध्ये मिठाचे प्रमाण अधिक असते, परंतु विमानात दबाव अधिक असल्यामुळे जेवताना आपल्याला ते कसलेच जाणवत नाही. विमानातील प्रवासादरम्यान प्रवाशांना आपत्कालीन उपाय म्हणून ऑक्सिजनचे मास्क दिलेले असतात. परंतु आपत्कालीन परिस्थितीत त्या मास्कचा वापर करून प्रवाशांना केवळ १५ मिनिटंच ऑक्सिजन घेता येतो.

१९५३ पूर्वी विमानाच्या खिडक्यांचा आकार चौकोनी होता. परंतु एका अपघातानंतर त्यांचा आकार गोलाकृती किंवा अंडाकृती करण्यात आला. गोलाकार किंवा अंडाकार खिडक्यांच्या कोपऱ्यांमुळे हवेला जास्त विरोध होत नाही आणि त्यामुळे विमानावर हवेचा दाबही कमी पडतो. १९८७ मध्ये अमेरिकेच्या एका व्यक्तीने एका विमान वाहतूक सेवेचा आजन्म पास काढला होता.

तेवढ्यासाठी त्याने ६९ लाख रुपये एअरलाईन्सला दिले होते. त्या पासच्या आधारे त्या व्यक्तीने २००८ पर्यंत १०००० हुन अधिक प्रसंगी विमानप्रवासाचा लाभ घेतला. परंतु त्याच्या या ६९ लाख रुपयांच्या पासच्या बदल्यातील १०००० वेळच्या प्रवासामुळे विमान वाहतूक कंपनीला जवळपास ४२ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे लक्षात आले. नंतर कंपनीकडून त्या व्यक्तीचा पासच रद्द करण्यात आला.