मराठी तमाशापटांनी रुपेरी पडद्यावर एक काळ गाजवला. आज काळ बदलला तरी लावणी आणि त्याच्या शृंगारतेचे वेड कायम आहे. अस्सल मराठी मातीचा संस्कार आणि साज घेऊन ‘पैज’ हा लावणीप्रधान मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘काकाजी आर्ट्स अॅण्ड फिल्म्स’ निर्मिती संस्थेच्या ‘पैज’ या चित्रपटाचा मुहूर्त नुकताच चित्रपटातील कलाकार व तंत्रज्ञ यांच्या उपस्थितीत अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी चित्रपटातील गीतांवर नृत्याचा नजराणा सादर करण्यात आला.
‘काकाजी आर्टस अॅण्ड फिल्म्स’ निर्मिती संस्थेने या आधी अनेक म्युझिक अल्बमची यशस्वी निर्मिती केली असून त्यांचा हा पहिलाच मराठी सिनेमा आहे.
पंढरीनाथ भालेराव, संतुकराव कोलते, विनोद वैष्णव यांची निर्मिती असलेल्या ‘पैज’ चित्रपटाचे दिग्दर्शन प्रकाश भालेकर करणार आहेत. एका सामान्य स्त्रीचा लावणी सम्राज्ञी होण्यापर्यंतचा रोमांचकारी प्रवास ‘पैज’ या चित्रपटातून उलगडणार आहे.
मोहन जोशी, मंगेश देसाई, सोनाली कुलकर्णी, सारा श्रवण, रमेश वाणी, प्रभाकर मोरे आदी कलाकारांच्या पैज चित्रपटात भूमिका आहेत. या चित्रपटाची कथा संजय कोलते यांनी लिहिली असून पटकथा- संवाद आणि संगीत पंढरीनाथ भालेराव, विनोद वैष्णव यांचे आहे. छायाचित्रण जितेंद्र आचरेकर तर नृत्य दिग्दर्शन किरण काकडे करणार आहेत.