मंडळी, नुकत्याच ग्रामपंचायतीच्या निवडणूका झाल्या. निकालही लागले. निवडून आलेल्या उमेदवारांचे विजय साजरे झाले. कुणी विजयी उमेदवार नवऱ्याला त्याच्या पत्नीने खांद्यावर उचलून घेतले. तर कुणी विजयी उमेदवाराला घालण्यासाठी पन्नास हजाराचा हार बनवून घेतला. कुणी डीजे साऊंड लावून, गुलाल उधळून,नाचून आनंद साजरा केला.
पण एका व्यक्तीने चक्क ‘सरपंच’ ह्या विषयावर गाणं तयार करून विजयी सरपंचाला संगीतबद्ध अभिनंदनाचा हार घातलाय. होय, आपण बोलत आहोत ‘हिरो सरपंच’ ह्या गाण्याविषयी. ‘आपला सरपंच हिरोला पडतोय भारी’ ह्या हुकलाईनच्या गाण्याचा सोशल मिडियावर व्हीडीओ आपल्या नक्की पाहण्यात आला असेल. अल्पावधीतच ह्या गाण्याने सोशल मीडियावरच्या इतर गाण्यांचं डीपॉझीट जप्त केलंय. गाण्याने बघता बघता सोशल मिडियावर पाच लाख व्हीवचा गुलाल उधळला आहे. गाण सुरू होताच अंग डुलावायला आपण भाग पडतो. गाणं जसं जसं पुढे सरकत तसं आपले हात वर जाऊन, दात ओठ खाऊन नाचायला देखील लागतो. इतक दमदार आवाजतलं, रांगड्या शब्दांचं हे गाणं लोकांच्या मनात सरपंचा विषयीचा अभिमान जीवंत ठेवते.
ह्या गाण्याचा विषय आहे सरपंच कसा गावाचा हिरो असतो. शब्द जसे आपल्या कानावर पडू लागतात तसं आपण आपल्या गावतल्या ग्रामपंचायतीमध्ये जावून पोहचतो. आणि दिसतो आपला लाडका हिरो, म्हणजेच आपला रुबाबदार, ताकदवान ‘सरपंच.’मंडळी, गाण्याच्या माध्यमातून सरपंचाचे हिरो पण बाहेर आणणार हिरो आहे तरी कोण..?
नवनाथ काकडे. यांनी हे गाणं स्वतः लिहिले आहे. ह्या गाण्याच्या निर्मितीची जबाबदारी देखील त्यांनीच पार पाडली आहे.. आता तुम्ही म्हणाल गाणं लिहिलंय आणि पैशे लावलेत ह्यात काय एवढं..??
नवनाथ काकडे यांनी थेऊरचं सरपंचपद भूषवले आहे. आणि महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेचे अध्यक्ष म्हणून सध्या कार्यरत आहेत.. ह्या परिषदेच्या माध्यमातून त्यांनी सरपंचाच्या प्रत्येक अडचणी सोडवल्या आहेत. गाणं बनवणे, व्हीडीओ बनवणे, गाणं लिहिणे हे त्यांचे क्षेत्र नसूनही सरपंचाविषयी आपुलकीची भावना मनात असल्यामुळे हे गाणं जन्माला आले.
मनात सरपंचाविषयी विशेष आदर, मान, सन्मान, अभिमान असल्यामुळे ह्या ग्रामपंचायत निवडणुकानंतर विजयी उमेदवारांना शुभेच्छा द्यायच्या ठरवल्या. त्यांनी मनातल्या भावना शब्दांच्या माळेत गुंफवले. गाणं लिहून प्रसिद्ध संगीतकार, गायक अवधूत गुप्ते यांच्याकडून संगीतबद्ध करून घेतले. ह्या गाण्याला अवधूत गुप्ते आणि शिंदेशाही बाणा सातासमुद्रापार पोहचवणारे आदर्श शिंदे यांचा आवाज लाभला आहे.
सरपंच हा नुसता सरपंच नसतो तर असतो गावाचा आधार, गावाची शान, गावाची ताकद, अभिमान, मान सन्मान, शान.. आणि असतो हिरो. हेच हिरो पण नवनाथ काकडे यांनी समाजासमोर मांडले आणि गाण्याची दखलही समाजाने घेतली.. आणि आता ते ‘हिरो सरपंच फेम नवनाथ काकडे’ म्हणून उदयास येत आहेत. ‘हिरो सरपंच’ हे गाणं नक्की ऐका.. आणि तुमच्या गावातल्या सरपंचाचा ह्या गाण्यावर व्हिडीओ बनवायला विसरू नका..!