नंदेश्वरचा टेलर झाला चित्रपट निर्माता – दिग्दर्शक
आलताफ शेख यांनी मनामध्ये एकच ध्येय ठेवून वडिलोपार्जित शिलाईचे काम करत करत खुप कष्ट करुन एक गोष्ट केली ती गोष्ट हिंदु मुस्लिम ऐक्यावर भाष्य करणारी आणि जगाला वेगळा संदेश देणारी तसेच लोकांच्या विचारांमध्ये परिवर्तन करणारी गोष्ट म्हणजे वेडा बी.एफ. (Boyfriend) या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन. या चित्रपटात प्रथमच बॉलिवूड सिंगर अल्ताफ राजा यांनी मराठीत कव्वाली गायली आहे. या चित्रपटात छत्रपती महारांजाचा एक पोवाडा आहे, जो मुस्लिम शाहिरावर चित्रित करण्यात आला आहे. या चित्रपटातुन छत्रपती शिवाजी महाराजांचा मुस्लिम समाजाचा विरोध नाही असा छोटासा संदेशही देण्याचा आलताफ शेख यांनी प्रयत्न केला आहे.
सोलापुर जिल्हयातील मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर या खेडे गावात दादासाहेब शेख हे ही आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालावा म्हणून नवे जुने कपडे शिवण्याचा व्यवसाय करत, त्यांना चार अपत्ये त्यांचा सर्वात लहान मुलगा आलताफ. शिक्षणापेक्षा नाविन्यपुर्ण गोष्टीमध्ये जास्त रमल्यामुळे त्याने शिक्षण दहावी नंतर थांबवले आणि वडीलांच्या कपडे शिवण्याच्या व्यवसायात मदत करू लागला. अखेर त्याने पुणे येथे जाण्याचा निर्णय घेतला. हाताला काम नसल्यामुळे सुरूवातीचे दिवस अत्यंत हालाखीत गेले राहण्याची खाण्याची कोणतीच सोय नव्हती. बसस्थानक, मंदिर, रेल्वे स्थानक, या ठिकाणी आसरा घेत व खिशातील १०० रूपयाचा आधार घेत कसेबसे दोन महिने काढले.
स्वत: कमवण्याची संधी मिळाली ती गवंड्याच्या हाताखाली कामगार म्हणून जे अपुर्ण अवस्थेत असलेल्या घरांचा आसरा म्हणून उपयोग होऊ लागला राहण्याची चिंता मिटली. सहा महिने गवंड्याच्या हाताखाली कामगार म्हणून काम केल्यानंतर नवनिर्मितीच्या ऊर्मीने त्याही ठिकाणी स्वस्थ बसू दिले नाही. पुन्हा नावीन्याचा शोध सुरू झाला. सतत नवीन काहीतरी शिकण्याच्या भुकेने आयुष्य जगण्यासाठी खूप चांगल्या चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या. या पुढच्या प्रवासाचा आधार स्तंभ म्हणून मावस भाऊ सय्यद पटेल मदतीला धावून आला. मावस भावामुळे अंगभूत कलागुणांना वाव मिळेल अशा क्षेत्रामध्ये काम करण्याची संधी मिळाली. मावस भाऊ सय्यद पटेल याच्या मदतीने वेशभूषा (फॅशन डिझायनिंग) चा अभ्यासक्रम पूर्ण केला.
त्यानंतर वेशभूषा व्यवसायामध्ये चांगला जम बसल्यानंतर चित्रपटामध्ये फॅशन डिझायनर काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर ८ वर्षे कला दिग्दर्शक म्हणून काम करण्याची संधी लाभली त्यामुळे इथेच आयुष्याने वेगळे वळण घेतले पुढे चित्रपट निर्मितीचे क्षेत्र खुणावु लागले.मनामध्ये पटकथा आकार घेऊ लागली पटकथेने अंतिम स्वरूप घेतले संवाद लिहून झाले अनेक दिग्दर्शकाच्या गाठी भेटी घेतल्या पण पदरी निराशा पण हरणे माहिती नव्हते. चित्रपट निर्मितीचे स्वप्न देहात रूपांतरित झाले. त्यासाठी वाटेल ते कष्ट करण्याची तयारी मनाने अगोदरच केली होती.
मार्गातल्या एक एक अडथळ्यावर टप्या टप्याने मात करण्याचे काम सुरू झाले. प्रथम त्याने हैद्राबाद या ठिकाणी जाऊन दिग्दर्शकाचे प्रशिक्षण पुर्ण केले. त्यानंतर सकाळ इंटरनॅशनल लर्निग सेंटर पुणे या ठिकाणाहून फिल्म मेकिंगचे प्रशिक्षण घेऊन चित्रपटाच्या चित्रीकरणाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. शुभारंभाचे चित्रिकरण पुणे येथील लोणी येथे झाले व शेवट जन्म भूमी नंदेश्वर या गावी करण्यात आला.
१९ जानेवारी रोजी बी.एफ हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचे यशापयश हे प्रेक्षक ठरवतील परंतु प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे. वेडा बी.एफ या चित्रपटासाठी संगीत दिग्दर्शक मोनु अजमीरे, छायाचित्रकार संतोष कादापुरे, कलादिग्दर्शक दिलीप धुमाळ,अभिनेता सागर भोरे, निर्माता सफर शेख, सहाय्यक दिग्दर्शक सतीश खांडवे, नंदकिशोर धकेती ,अमिर पटेल, ध्वनीमुद्रक निकम काका, विशाल तसेच मित्र मंडळीनी भरपुर साथ दिली. या चित्रपटाची निर्मिती मुंबई क्रिऐशन इंटरटेनमेंट या कंपनी अाणी प्रस्तुतकर्ते मुस्तफा मलिक आहेत.