‘युवा सिंगर, एक नंबर’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून वेगवेगळ्या ‘एक नंबर’ गोष्टी पाहण्याची प्रेक्षकांना संधी मिळणार आहे. ‘झी युवा’वरील या गाण्याच्या स्पर्धेत, गायिका सावनी शेंडेसह अभिनेता वैभव मांगले हे परीक्षकाच्या खुर्चीत बसलेले पाहायला मिळतील. या कार्यक्रमाची संकल्पना सुद्धा फार निराळी आणि आगळीवेगळी असणार आहे. महाराष्ट्रातील निरनिराळ्या भागातून आलेल्या तरुण गायकांची ही स्पर्धा नेमकी कशी असेल, हे पहिला एपिसोड पाहिल्यावरच प्रेक्षकांना कळणार आहे. संकल्पना गुलदस्त्यात असली, तरीही या कार्यक्रमाची सूत्रसंचालिका कोण आहे, हे जाणून घेताना रसिकांना नक्कीच आनंद होईल.

सर्वांची लाडकी अभिनेत्री, मृण्मयी देशपांडे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहे. या गुणी अभिनेत्रीला सूत्रसंचालकाच्या भूमिकेत पाहण्याची संधी ‘युवा सिंगर, एक नंबर’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळेल.

मालिका किंवा चित्रपटांमध्ये अभिनय करण्यापेक्षा, सूत्रसंचालन अधिक आव्हानात्मक असते, हे मृण्मयी आवर्जून नमूद करते. प्रेक्षक, स्पर्धक आणि परीक्षक यांच्यातील दुवा साधण्याची कला अवगत असणे यासाठी गरजेचे असते. तिच्या सूत्रसंचलनाची पद्धत, स्वाभाविक शैली, स्पर्धकांना तिच्याकडून मिळणारे प्रोत्साहन यामुळे कार्यक्रमाची रंगत आणखी वाढणार आहे. ही भूमिका उत्तम तर्हेने पार पाडण्यासाठी व ‘युवा सिंगर्स’च्या मंचावर ‘एक नंबर’ धुमाकूळ घालण्यासाठी ही अभिनेत्री सज्ज आहे.

ही गुणी अभिनेत्री बऱ्याच कालावधीनंतर सूत्रसंचालनाच्या भूमिकेत आपल्याला झी युवावरील युवा सिंगर एक नंबर या कार्यक्रमाच्या माध्यमातुन बुधवार ते शुक्रवार रात्री ९ वाजता भेटायला येईल. वैभव मांगले, सावनी शेंडे आणि मृण्मयी देशपांडे यांचा सहभाग असलेल्या या कार्यक्रमाविषयी प्रेक्षकांची उत्सुकता आता आणखी वाढली आहे.