कोविड-१९च्या संकटाचा सामना करण्यासाठी सारीच मंडळी लॉकडाऊनमध्ये आहेत. या लॉकडाऊनचा चांगला वापर करून घेण्याचा प्रयत्न अनेक सेलिब्रिटी मंडळी सुद्धा करत आहेत. आपले छंद जोपासण्यासाठी काहींनी किचनचा तर, काही मंडळींनी घरातील जिम आणि योगा यांचा मार्ग निवडला आहे. मयूर वैद्य मात्र याला काही प्रमाणात अपवाद आहे. छंद आणि फिटनेस यांचा योग्य मेळ साधत, तो नृत्याचा रियाज करत असल्याचे लक्षात आले आहे.
मयूर वैद्य आणि कथ्थक, हे समीकरण सगळ्यांच्याच परिचयाचे आहे. ‘झी युवा’ वाहिनीवरील ‘युवा डान्सिंग क्वीन’ या स्पर्धेच्या निमित्ताने मयूर परीक्षक म्हणून घराघरात पोचला. सर्व स्पर्धकांप्रमाणेच मयूर सुद्धा प्रेक्षकांचा लाडका ठरला आहे. त्यामुळेच, लॉकडाऊनच्या काळात मयूर काय करतो, हे जाणून घेण्याची इच्छा प्रेक्षकांना आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून मयूर त्याच्या चाहत्यांच्या संपर्कात आहेच. कथ्थकचा रियाज करत असतानाचा त्याचा विडिओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याच्या नृत्यातील साज, चाहत्यांसह सगळ्यांच्याच चर्चेचा विषय ठरत आहे. ‘कुठल्याही गोष्टीत निपुण होण्यासाठी, रियाज अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी सातत्याने मेहनत घ्यायला हवी’ असा संदेश सुद्धा त्याने या विडिओमध्ये दिला आहे. कथ्थकमधील विश्वरत्न असूनही, अधिकाधिक निष्णात होण्यासाठी नियमित रियाज करत असलेल्या मयूरचे खूप कौतुक होत आहे