असे करा एकापेक्षा जास्त कर्ज खात्यांचे प्रभावी व्यवस्थापन आपल्या नावावर एकापेक्षा जास्त कर्ज खाती असणे हे आजकाल अगदी सामान्य आहे. असे दिसते की, गृह कर्ज सुरू असेल अशा बर्याकच कुटुंबांचे आणखी एखादे कार लोन किंवा वाहन कर्ज देखील सुरूच असते. जर तुमची एकापेक्षा जास्त कर्जखाती चालू असतील, तर त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही कर्जात बुडून जाल. प्रभावी व्यवस्थापन केल्यास, ते कर्ज तुमच्या आटोक्याबाहेर जाणार नाही आणि हळूहळू तुम्ही कर्जमुक्त व्हाल. एकाहून जास्त कर्ज खात्यांचे व्यवस्थापन कसे करावे याबद्दल अधिक माहिती सांगताहेत क्यूबेरा डॉटकॉमचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री आदित्य कुमार.

तुमच्या मासिक क्रेडिट कार्ड देयापूर्वी व्यक्तिगत कर्जाचे हफ्ते भरा

क्रेडिट कार्ड खात्यात पैसे भरण्यापूर्वी तुमच्या व्यक्तिगत खात्यातील मासिक हप्ता आधी भरणे हितावह आहे. याचे कारण हे आहे की क्रेडिट कार्डच्या पेमेंटमध्ये कसूर किंवा विलंब होण्यापेक्षा व्यक्तिगत कर्जाच्या भरपाईत कसूर किंवा विलंब झाला तर तुमच्या क्रेडिट स्कोअरवर अधिक परिणाम होतो. व्यक्तीगत कर्जात कसूर होण्याची बाब बरीच गंभीर होऊ शकते. व त्यामुळे तुमचा स्कोअर तब्बल ५० गुणांनी कमी होऊ शकतो. जेव्हा तुमची एकाहून जास्त कर्ज खाती असतात, तेव्हा तुम्हाला पैशाची चणचण जाणवतेच. अशा परिस्थितीत तुम्ही पेमेंट करण्याची प्राथमिकता त्यानुसार ठरवणे महत्त्वाचे असते.

अतिरिक्त क्रेडिट कार्ड कर्ज घेऊ नका

या मुद्द्याचे महत्व कधीच कमी लेखू नका. एकापेक्षा जास्त कर्ज खाती असताना आणि ते उतरवण्याची काहीही तयारी नसताना जर तुम्ही जादा क्रेडिट कार्ड कर्ज घेतलेत, तर धोका तुमच्या अगदी जवळ आहे असे समजा. क्रेडिट कार्डचे व्याज वार्षिक सुमारे ३५-४०% इतके प्रचंड असते. त्यामुळे जितके जास्त क्रेडिट कार्डसचे कर्ज तितकी तुमची किमान भरपाईची रक्कमही मोठी होते. आणि महिन्याच्या इतर खर्चांसाठी तुमच्या खिशात पुरेसा पैसा राहात नाही.

एकावेळी एक कर्ज मुदतीच्या आधी बंद करण्यावर लक्ष केंद्रित करा

तुमची किती कर्ज खाती आहेत यावर हे पूर्णपणे अवलंबून आहे. जर तुमची २ खाती असतील तर तुम्ही काही महिन्यांत त्यातील एक खाते बंद करू शकता. पण जर तुमची ३ खाती असतील, तर ती जरा जास्तच आहेत. जेव्हा तुम्ही मुदतीपूर्वी एखादे खाते बंद करायचे ठरवत असाल, तेव्हा सर्वात जास्त व्याजाचे कर्ज आधी बंद करा. तसेच क्रेडिट कार्ड खात्यांच्या आधी हे कर्ज खाते बंद करा.

बॅलन्स ट्रान्सफर किंवा डेट कन्सॉलिडेशन कर्ज या पर्यायांचा विचार करा

अनेक कर्जांमधून मोकळे होण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे डेट-कन्सॉलिडेशन कर्ज घेणे आणि सगळी कर्जे फेडून एकच कर्ज ठेवणे. सर्व बँका डेट-कन्सॉलिडेशन कर्ज देत नाहीत आणि असे कर्ज मिळवण्यासाठी कर्ज भरपाईचा तुमचा इतिहास आणि क्रेडिट स्कोअर चांगला असावा लागतो. डेट-कन्सॉलिडेशन कर्जाचा व्याजदर हा व्यक्तिगत कर्जांपेक्षा थोडा जास्त असतो. सामान्यतः मोठ्या खाजगी बँका अशी डेट-कन्सॉलिडेशन कर्जे देतात. म्हणून, तुमची बँक असे कर्ज देते का याचा तपास करा. सर्वसाधारणपणे बँका डेट-कन्सॉलिडेशन कर्ज देताना अनेक निकष पाहतात, जसे की, नोकरीची स्थिरता, तुम्ही किती वर्षांपासून कर्ज घेत आहात, बँकेशी तुमचे नाते, इ.

मासिक हप्ते भरता यावेत यासाठी लहान कर्जे घेऊ नका

आपल्या एक किंवा अधिक कर्जांचे मासिक हप्ते भरण्यासाठी तुम्हाला एखादे लहानसे कर्ज घेण्याचा मोह होऊ शकतो, पण तसे कदापि करू नका. इतर गोष्टींवर खर्च करण्याअगोदर कर्जाची परतफेड करा. आणखी कर्जांसाठी अर्ज केल्यास तुमच्या क्रेडिट स्कोअरवर विपरीत परिणाम होईल आणि हप्त्यांची संख्या बरीच होत असेल तर कर्ज तुम्हाला नाकारलेही जाऊ शकते. यामुळे तुमचा क्रेडिट स्कोअर आणखीन बिघडेल. व त्यामुळे भविष्यात देखील तुम्हाला कर्ज न मिळण्याची शक्यता वाढेल.