ज्याला विकायचं कसं कळतं, त्याला यशस्वी होण्यासाठी कसल्याही मार्गदर्शनाची गरज पडत नाही.
अहमदनगर मधून पुण्याकडे जाताना रेल्वे उड्डाण पूल सोडल्यानंतर डाव्या बाजूला हे छानसे दृश्य बघायला मिळाले… रस्त्याच्या कडेला इनोव्हा गाडी लावून द्राक्षे विकणारे ‘जमील पटेल’.
गाडी चालवता चालवता अचानक रस्त्याच्या बाजूला हि इनोव्हा उभी दिसली, स्पीड मधे असल्यामुळे मी बराच पुढे निघून गेलो, नंतर बघू असं विचार आला, पण राहावेनाच… पुन्हा यु टर्न घेऊन मागे आलो.
इनोव्हातुन द्राक्षे विकणारा व्यक्ती पहिल्यांदाच पाहायला मिळाला. (गाडी त्यांची स्वतःची आहे.) जमील पटेल हे मूळचे श्रीगोंद्यातले. सध्या राहायला केडगावला. श्रीगोंद्यामध्ये त्यांच्या मामांची द्राक्षाची शेती आहे. निर्यातक्षम वगळता इतर द्राक्षे स्थानिक बाजारात विकतात. त्यातीलच काही माल जमील नागरमधे आणून विकतात.
रस्त्याच्या कडेला मस्तपैकी गाडी पार्क केलेली, बाहेर टेबल वर द्राक्षे ठेवलेले. गाडीच्या डिकीमध्ये स्वतः जमील बसलेले, अशा वेळी त्यांचा फोटो काढण्याची इच्छा होणारच होती. दोन तीन छान फोटो काढले, पंधरा मिनिटे त्यांच्याशी गप्प मारल्या आणि पुढच्या मार्गाला निघालो…
मी कधीही कुणाला, महिन्याला किती उत्पन्न मिळतं हा प्रश्न विचारत नाही. फक्त उलाढाल विचारतो. जमील दिवसाला ६-७ क्रेट द्राक्षे विकतात. म्हणजे जवळ जवळ दीडशे ते पावणे दोनशे किलो द्राक्षे विकतात. पन्नास रुपये किलोच्या हिशोबाने हि उलाढाल आठ नऊ हजाराची होते… हा विषय शेती बिगर शेती असा नाहीये. तुम्हाला विकता आलं पाहिजे हा मुख्य मुद्दा आहे. जो विकू शकतो तोच व्यवसायात यशस्वी होऊ शकतो.
स्टेटस च्या नावाखाली चांगल्या चांगल्या व्यवसायाच्या संधी सोडणारे मी बरेच जण पाहिलेत… पण स्टेटस, इमेज, त्या चार लोकांचा चा विचार न करता व्यवसाय करणारा असा अवलिया पाहायला मिळणं दुर्मिळच
‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
Copyright: उद्योजक मित्र