झी मराठी वाहिनीवरील संजय मोने यांच्या ‘कानाला खडा’ या चॅट शोची सर्वत्र चर्चा चालू आहे. या कार्यक्रमात संजय मोने कलाकारांशी गप्पा मारतात आणि त्यांच्या आयुष्यातील काही आठवणींना उजाळा देतात. तसंच कलाकारांच्या आयुष्यातील कानाला खडा लावणारे काही किस्से देखील या गप्पांमध्ये रंगतात. हा कार्यक्रम नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आणि नवनवीन व भन्नाट किस्स्यांमुळे रंगणाऱ्या या मैफिलीने तो अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस देखील पडला.
शनिवारच्या भागात अभिनेत्री तेजश्री प्रधान कानाला खडाच्या मंचावर सज्ज होणार आहे. होणार सून मी या घरची या मालिकेमुळे तेजश्री महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली आणि त्यापुढील तिची अभिनय क्षेत्रातील यशस्वी आपण सर्व पाहतच आहोत. तिचा आतापर्यंतचा प्रवास आणि तिला वाटणाऱ्या काही खंत तिने संगळ्यांसमोर मांडल्या. एक अभिनेत्री म्हणून तेजश्रीला सेल्फीने आवडत नसल्याचं तिने सांगितलं. “दोन तास एक नाटक सादर केल्यानंतर प्रेक्षक आमच्यासोबत सेल्फी काढायला येतात. त्यांचं प्रेम मी समजू शकते पण येऊन सेल्फी काढून ते निघून जातात. आम्ही २ तास त्यांच्यासाठी एक कलाकृती सादर केली त्याबद्दलची प्रतिक्रिया त्यांच्याकडून येत नाही.
ते फक्त सेल्फीसाठीच येतात की काय असं वाटतं आणि त्यामुळे माझ्यातील कलाकार कुठेतरी हळहळतो. म्हणून मी सेल्फीवर नाराज आहे.” असं तेजश्री म्हणाली. तेजश्रीने तिच्या कारकिर्दीत कशामुळे कानाला खडा लावला हे जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका कानाला खडा शनिवारी रात्री ९.३० वाजता फक्त आपल्या झी मराठीवर.