रोमियो-ज्युलिएट, हिर-रांझा, लैला-मजणूच्या प्रेमकहाणी बरोबरच आपल्या मातीतील अशी मराठमोळी जोडगोळी म्हणजे मल्हार-मायडीची प्रेमकथा. डॉल्फिन सिनेक्राफ्ट प्रस्तुत श्रुती वसंत दांडेकर निर्मित आणि प्रवीण रमेश क्षीरसागर दिग्दर्शित आपल्याच मातीतील मराठमोळ्या अशा प्रेमकथेवर सूचक भाष्य करणारा ‘इभ्रत’ हा चित्रपट लवकरच मायबाप रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आणि हा चित्रपट साऱ्या प्रेक्षकांकरीता मेजवानी ठरणार यांत शंकेला जागाच नाही. नुकताच ‘इभ्रत’ चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला. चित्रपटाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना चित्रपटाच्या ट्रेलर एक वेगळीच बाजी मारेल असे म्हणायला हरकत नाही. सोशल मीडियावर प्रदर्शित झालेला इभ्रत चित्रपटाचा ट्रेलर मायबाप रसिक प्रेक्षकांसाठी चित्रपटाबद्दलची औत्सुक्यता वाढवणारा नक्कीच आहे.

‘आवडी’ या अण्णाभाऊ साठेंच्या कादंबरीबर आधारलेली सत्य घटनेवर आधारित ‘इभ्रत’ चित्रपटाची कथा-पटकथा आहे. शिवाय ‘इभ्रत’ या म्युझिकल प्रेमकहाणीला हिंदी मराठी सृष्टीतील सुप्रसिद्ध गायकांनी म्हणजेच जसराज, आकांक्षा भोईर यांनी आपल्या दमदार आवाजात खुलवून टाकले आहे. तर दिग्दर्शक अशोक कांबळे आणि बबन अडागळे यांनी चित्रपटातील गाण्यांना संगीतबद्ध केले आहे. या चित्रपटात संजय शेजवळ, शिल्पा ठाकरे, सुरेश विश्वकर्मा, डॉ.सुधीर निकम, अनिकेत केळकर, वृषाली हटळकर, राहुल बेलापूरकर आदी कलाकारांनी महत्वपूर्ण भूमिका वठवल्या आहेत. आणि चित्रपटाची पटकथा, संवाद आणि गाण्याचे बोल संजय नवगिरे लिखित आहेत.

चित्रपटाच्या वितरणात पिकल एंटरटेनमेंटचा खारीचा वाटा आहे. मल्हार-मायडीच्या या रांगड्या प्रेमकथेचा प्रवास मोठ्या पडद्यावर पाहणं, सर्वाना नक्कीच रंजक ठरेल. येत्या २१ फेब्रुवारी २०२० ला प्रेमकथेवर भाष्य करणारा हा ‘इभ्रत’ चित्रपट सर्वत्र महाराष्ट्रात प्रदर्शित होईल.