झी युवा या वाहिनीवर ‘युवा सिंगर एक नंबर’ हा गाण्यांवर आधारित एक अतिशय उत्कृष्ट असा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहिला जातो. या कार्यक्रमाचा महा अंतिम सोहळा हा १० नोव्हेंबर ला रात्री ७ वाजता झी युवा वाहिनीवर प्रक्षेपित होईल. या कार्यक्रमाचे चित्रीकरण नुकतेच बारामतीच्या गदिमा सभागृहात दिवाळी निमित्त आयोजित कार्यक्रम शारदोत्सव मध्ये शरद पवारांच्या उपस्तिथीत पार पडला. या कार्यक्रमात ओंकार कानिटकर, जगदीश चव्हाण, दर्शन-दुर्वांकुर, पूजा-पल्लवी, अनिमेश ठाकूर आणि एम एच फोक बँड हे ६ अंतिम प्रतिस्पर्धी होते.
या कार्यक्रमाच्या एका ऍक्ट मध्ये बालगायक ओंकारने शरद पवारांकडे एक वेगळीच मागणी केली. बारामती मध्ये झालेल्या युवा सिंगर एक नंबर या कार्यक्रमाच्या महाअंतिम सोहळ्यात बालगायक ओंकार कानिटकरने एक ऍक्ट सादर केला. ज्यात तो एक राजकारणी नेता बनून आला होता. बारामतीमधील राजकीय हवामानाने त्यालाही स्फुरण चढले आणि त्याने कार्यक्रमाची निवेदिका मृण्मयी देशपांडे हिला सांगितले मी आज नुसत्या राजकारणी नेत्याच्या वेशात नाही आहे तर मलाही मुख्यमंत्री व्ह्ययचंय. ह्यावर सभागृहात एकंच हशा पिकला.
हा बिलंदर एवढंच म्हणून थांबला नाही तर “मी मुख्यमंत्री होणार पण मला मुख्यमंत्री बनवणार ते पवार साहेब.” यावर सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. मग काय त्याने थेट शरद पवारांना विनंती केली की कराल ना हो मला मुख्यमंत्री? यावर निवेदिका मृण्मयी देशपांडे सारवासारव करत हसत पवारांना म्हणाली, की यातलं आम्ही ओंकारला काहीही करायला सांगितले नाही त्यावर पवार तिला म्हणाले, बारामतीकरांना कोणीही काहीही सांगायची गरज नसते आणि हसून ओंकारला मुख्यमंत्री करण्याची ग्वाही दिली.
यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की “महाराष्ट्रात अनेक मुख्यमंत्री झाले त्यातला सगळ्यात युवा मुख्यमंत्री हा राज्यातून आणि देशातून बारामतींने दिला आहे. त्यामुळे भविष्यात ओंकार सुद्धा मुख्यमंत्री होऊच शकतो.” ‘युवा सिंगर एक नंबर’ या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा हा रविवार १० नोव्हेंबर ला रात्री ७ वाजता झी युवा वाहिनीवर पाहायला विसरू नका.