ऐतिहासिक कथानकाचा आधार घेत आणखी एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मराठी भाषिक प्रेक्षकांसाठी हा चित्रपट जरा जास्तच महत्त्वाचा आहे, कारण त्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांपैकीच एक अशा, वीर तान्हाजी मालुसरे यांच्या पराक्रमाची गाथा पाहता येणार आहे.
ओम राऊत दिग्दर्शित ‘तान्हाजी- द अनसंग वॉरियर’ या चित्रपटात अभिनेता अजय देवगन हा तान्हाजी मालुसरे यांच्या भूमिकेत झळकणार आहे. अजयने काही दिवसांपूर्वीच त्याच्या लूकवरुन पडदा उचलला. तेव्हापासूनच या चित्रपटात शिवाजी महाराजांची भूमिका कोण साकारणार, याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली होती.
हीच उत्सुकता शिगेला पोहोचल्यानंतर आता शिवाजी महाराजांची भूमिका साकारत असलेला कलाकार सर्वांसमोर आला आहे. ‘बाहुबली’ या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनला आवाज देणारा आणि बऱ्या चित्रपटांमध्ये स्क्रीन शेअर करणारा हा अभिनेता आहे, शरद केळकर. खुद्द शरदनेच सोशल मीडिया अकाऊंटवरुन चित्रपटाचा लूक सर्वांच्या भेटीला आणला आहे.
फोटो पोस्ट करत त्यासोबतच्या कॅप्शनमध्ये ही भूमिका साकारण्याची संधी मिळाल्याबद्दलचा आनंद त्याने व्यक्त केला आहे. ‘एखाद्या कलाकरासाठी छत्रपति शिवाजी महाराजांच्या पेहरावात त्यांची देहबोली साकारण्याऐवढी भाग्याची आणि पवित्र गोष्ट कुठलीच नाही….हर हर महादेव…’, असं लिहित त्याने महाराजांच्या रुपातील फोटो पोस्ट केला आहे.
या फोटोमध्ये महाराजांच्या रुपातील शरद प्रथमत: ओळखताच येत नाही आहे. तेच तेज, तोच आत्मविश्वास, भेदक पण तरीही शांत नजर अशा रुपातील शरद पाहताना खरेखुरे महाराजच पाहत असल्याचा भास होतो.
फक्त शिवाजी महाराजच नव्हे, तर या चित्रपटातील जिजामाता आणि औरंगजेब या महत्त्वाच्या व्यक्तीरेखा कोण साकारणार यावरुन पडदा उचलला गेला आहे. अभिनेता ल्यूक केनी मुघल शासक औरंगजेबाची व्यक्तीरेखा साकारेल. तर, स्वराज्यजननी जिजामाता यांची व्यक्तीरेखा साकारण्यासाठी चित्रपटात अभिनेत्री पद्मावती राव यांची वर्णी लागली आहे.