Father’s Day Special

1724
बाबा माझे आधार
प्रत्येक मुलीसाठी तिचे बाबा स्ट्राँगमॅन असतात. जेव्हा कधी भीती वाटली कि तिला पहिले तिचे बाबा आठवतात. माझे देखील अगदी तसेच आहे. गम्मत म्हणजे माझा आगामी Lapachhapi ‘लपाछपी‘ सिनेमा भुताचा आहे. त्यामुळे सिनेमा पाहताना भीती ही वाटणारच! असो. हा निव्वळ योगायोग असला तरी, बाबा जवळ असले की कसलीच भीती वाटत नाही. मी जेव्हाही खचते तेव्हा माझा पहिला फोन हा बाबांनाच असतो. मला लहानपणापासून जेव्हाही एकटेपणा वाटला तेव्हा त्यांनीच मला आधार दिला आहे. आजही एखादी गोष्ट अडखळली कि मी लगेच बाबांकडे धाव घेते. त्यांच्या मार्गदर्शनाने माझा आत्मविश्वास वाढीस लागतो, ते नेहमीच मला प्रोत्साहन देण्याचे काम करतात. ते स्वभावाने मितभाषी आहेत, त्यामुळे कोणाबरोबर जास्त बोलणे पसंत करत नाहीत. आमच्यातलं बाबा आणि मुलीचं नातं हे अबोल जरी असलं तरी खूप छान आणि गोंडस आहे.
 

Pooja Sawant पूजा सावंत, अभिनेत्री 


 

बाबांचा आदर्श घेऊन माझे व्यक्तिमत्व घडवते
Mrinal Jadhav
माझे बाबा मुंबई पोलीस खात्यात असल्यामुळे, मला त्यांच्यासोबत जास्त वेळ व्यतीत करता येत नाही. पण जेव्हा ते फ्री असतात तेव्ह्या जास्तीतजास्त वेळ त्यांच्याबरोबर घालवणे मी पसंत करते. माझ्या बाबांबद्दल सांगायला गेले तर भरपूर काही आहे. खरं तर… अभिनयक्षेत्रात येण्याचे प्रोत्साहन मला बाबांकडूनच सर्वातआधी मिळाले. आमच्या घरात याआधी कोणीच या क्षेत्रात वळले देखील नव्हते. पण बाबांनी माझी आवड लक्षात घेत, यात काम करण्याची मुभा दिली. आईपेक्षा बाबांसोबत माझी जास्त बॉन्डीग आहे. त्यांच्याशी मी प्रत्येक गोष्ट शेअर करत असते, ते सतत माझ्यासोबत असावेत असे मला वाटते, कधी कधी तर ते वेळ देत नाही म्हणून मी त्यांच्यावर रागावते देखील. पण तो अबोला काही वेळापुरताच असतो. माझ्या आगामी Andya Cha Funda (2017) ‘अंड्या चा फंडा’ या चित्रपटाच्या शुटींगमध्ये ते माझ्यासोबत असावेत असे मला वाटत होते, पण ते प्रत्येकवेळी शक्यच होईल असे नाही, याची जाणीव मला होती. बाबांशी बोलल्याखेरीज मला समाधान लाभत नाही. माझे बाबा मुंबई पोलिस खात्यात असल्याचा मला फार अभिमान असून त्यांच्या कामिगिरीचा आदर्श घेऊन मी माझं व्यक्तिमत्त्व घडवण्याचा प्रयत्न करते आहे.

Mrinal Jadhav मृणाल जाधव, बालकलाकार


 

….आणि बाबांनी मला झेलले
माझे बाबा सुनील धबडगावकर म्हणजे प्रेमळ व्यक्तिमत्व. त्यांच्याबद्दल जेवढे काही बोलू तेवढे कमी आहे. माझ्या कामाचे कोडकौतुक त्यांना खूप असते. माझ्या आगामी Bus Stop ‘बसस्टॉप’ सिनेमाची एक्साईटमेंट माझ्यापेक्षा अधिक त्यांना आहे. मी लहानपणापासूनच शांत स्वभावाची मुलगी आहे. पण कधी कधी खूप अतरंगीपणा करायचे,  असे बाबाच बोलतात. फादर्स डे निमित्ताने एक गोष्ट मला शेअर करावीशी वाटते, माझ्या लहानपणीचा एक किस्सा त्यांनीच मला सांगितला होता. तो असा कि,  मी, आई आणि बाबा डोंबिवली स्टेशनला होतो, त्यावेळी खुप धो-धो पाऊस पडत होता.. रेल्वे स्थानकावर खुप गर्दी असल्यामुळे सर्वजण आपापली छत्री संभाळत चालत होते. पाऊस जास्त असल्यामुळे बाबांनी मला खादंयावर घेतलं होत, मात्र तिथे देखील मला स्टंटबाजी करायची शक्कल सुचली आणि बाबांच्या खांद्यावरुन भरपावसात मी उसळी मारली,  बाबांनी मला पकडण्याचा प्रयत्न केला पण मी सटकले, तेवढ्यात त्यांनी छत्री उलटी केली आणि मला छत्रीत झेलंल… अक्षरशः पडता पडता मी वाचले होते, त्यानंतर बाबांनी पुन्हा मला त्यांच्या खांदयावर पकडून बसवलं. खूप भन्नाट किस्सा होता तो. मात्र आता जसजशी मोठी होत गेली, स्वतःमध्ये बदल घडवत गेली. मागच्या चुका सुधारत गेली, आणि माझ्या या सर्व धडपडीच्या प्रवासात ते मला सांभाळत आले आहेत, आणि आज देखील तितक्याच तत्परतेने मला सांभाळत आहेत.

Rasika Sunil रसिका सुनील, अभिनेत्री


 

त्यांची मुलगी असल्याचा अभिमान वाटतो
माझे बाबा एअरफोर्समध्ये होते. त्यामुळे लहानपणापासूनच त्यांनी त्यांच्यातला परफेक्टशनीसपणा आमच्यावर बिंबवला आहे. माझ्या बाबांकडून मी अनेक गुण आत्मासात केले आहेत,  त्यापैकी
बाबांकडून मिळालेला पहिला गुण म्हणजे स्वावलंबीपणा. सेटवर असताना स्वतःची लहान मोठी कामे करणे दुसऱ्या व्यक्तीवर अवबंलून न राहण हे मी बाबांकडून शिकले आहे. बाबा नेहमी सांगतात प्रत्येकाने स्वतःची कामे शक्य तेवढी स्वबळावर करायला हवी. त्यांच्या सर्व शिकवणीचा आता मला खूप फायदा होतो आहे. लहानपणापासूनचं त्यांनी मला प्रत्येक गोष्टीचं स्वातंत्र्य दिलं आहे.  मग ते करिअर निवडण्यापासून असो ते आयुष्यातील महत्वाचे निर्णय घेण्याबाबतचे असो, बाबा नेहमी माझ्या पाठीशी खंबीर उभे असतात. दुसरा महत्त्वाचा गुण म्हणजे वक्तशीरपणा. वेळ हि एक आयुष्यातली महवाची गोष्ट असल्यामुळे ती पाळायलाच हवी असा अट्टाहास बाबांचा असतो, आणि मी देखील त्यांचा हा वारसास पुढे चालवते आहे. माझ्या शूटींगच्या ठिकाणी तसेच कुठे फंक्शन असेल, तर मी नियोजित वेळेच्या ५ मिनिटे आधीच तिथे पोहोचलेली असते. त्यामुळे अनेकदा माझे कौतुक देखील करण्यात आलं आहे. माझ्या आयुष्यातील प्रत्येक चांगल्या गोष्टींसाठी मी त्यांची खूप ऋणी आहे. मी त्यांची मुलगी आहे याचा मला अभिमान वाटतो.

Reena Agrawal रीना अगरवाल, अभिनेत्री


 

माझे बाबा माझे सुपरहिरो
माझे बाबा पुरुषोत्तम विनायकराव जाधव माझे प्रेरणास्थान आहेत. मी आज जे काही आहे ते केवळ त्यांच्यामुळेच. मला आजही आठवते कि ते मोठे सरकारी अधिकारी असल्याने त्यांच्या नावाचा मी लहानपणी खूप फायदा उचलला होता. आम्ही मुळचे नागपूरकर आणि तिथल्या सावनेर या तालुक्यात ते तहसीलदार होते, त्यामुळे माझी मोठीच बिशाद असायची. मित्रांना घेऊन जाऊन कुठेही पैसे न देता खायचो आणि फिरायचोदेखील. गावात सगळे मला जाधव साहेबांचा मुलगा म्हणून ओळखायचे, आणि त्याचा मला गर्व देखील होता. पण जसजसा मोठा होत गेलो बाबांनी मला वळण लावण्यास सुरुवात केली. त्यांच्या नावावर मी जी काही मौजमज्जा केली होती, त्या सर्वांची परतफेड माझ्या मागे ते करत असे, हे जेव्हा मला समजले त्यावेळी त्यांच्याबद्दलचा मला वाटणारा आदर दुपटीने वाढला. त्यानंतर कोणतेही काम स्वतःच्या हिम्मतीवर आणि पायावर उभे राहून करण्याची शिस्त मला लाभली. माझ्या आयुष्यातील महत्वाच्या निर्णयात ते नेहमी माझ्यासोबत असतात. जेव्हा मी बारावीत नापास झालो होतो, तेव्हा सर्वच मला हसत होते मला तुच्छतेने बघत असायचे, पण वडिलांनी मला खंबीर साथ दिली. ‘बारावीची परीक्षा मोठी नाही, तुला आजून खूप काही करायचे आहे आयुष्यात! तू नुसता पास नाही होणार तर एक दिवस माझं नाव मोठं करणार’, असा विश्वास त्यांना होता आणि अजून ही आहे. त्यांच्या प्रेरणेनंतर मी त्या दिवसापासून प्रत्येक गोष्ट मन लावून, जिद्दीने आणि चिकाटीने करतो आणि त्या सर्व गोष्टी सार्थकदेखील होताच, आता तर लोक त्यांना माझ्या नावाने ओळखायला लागले आहेत. श्रेयश चे बाबा म्हणून लोक त्यांना संबोधत आहेत, त्याचा खूप जास्त अभिमान वाटतो. बाबांची हि चिरंतर साथ आजही माझ्यासोबत आहे. ते माझे आधारस्तंभ आणि आयडॉल आहेत, लव्ह यु बाबा, यु आर माय सुपर हिरो!
Shreyas Jadhav श्रेयश जाधव, निर्माता, मराठी रॅपर