Dont Worry Be Happy 200 Shows

1507
“डोण्ट वरी Be Happy” नाबाद २००
 
अनेक जोडप्यांसाठी कौन्सेलर ठरतंय “डोण्ट वरी Be Happy”
पती-पत्नीचं नातं आणि जगण्यातला स्ट्रेस यावर भाष्य करणाऱ्या “डोण्ट वरी Be Happy” या नाटकानं २०० प्रयोगांचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. आताच्या बहुमाध्यमांच्या काळात एखाद्या नाटकाचे २०० प्रयोग होणं ही नक्कीच गौरवाची बाब आहे. हे नाटक म्हणजे अनेक जोडप्यांसाठी कौन्सेलर ठरलं आहे.
अलीकडच्या काळात पती-पत्नीच्या नात्यावर आधारित अनेक नाटकं मराठी रंगभूमीवर आली. कौटुंबिक नाटकाची संकल्पना बाजूला ठेवत सध्याच्या काळाच्या नजरेतून बदलणारी नाती हा या नाटकांचा केंद्रबिंदू ठरला. सोनल प्रॉडक्शन्सच्या नंदू कदम निर्मित मिहीर राजदा लिखित आणि अद्वैत दादरकर दिग्दर्शित “डोण्ट वरी Be Happy” हे नाटकही बदललेला काळ आणि त्या अनुषंगानं पती-पत्नीचं बदलणारं नातं या विषयीच भाष्य करतं. ‘स्ट्रेस’ हा शब्द आपण फार गंभीरपणे घेत नाही. खरं तर स्ट्रेसचे परिणाम मनावर, शरीरावर होतात. त्याचा परिणाम शेवटी नातेसंबंधावर होतो. “डोण्ट वरी Be  Happy” मधील अक्षय आणि प्रणोती यांची कथा म्हणजे कॉर्पेरेट जगतातील प्रत्येक मध्यमवर्गीय जोडप्याच्या घरात घडणारी स्ट्रेसफुल गोष्ट. मोठय़ा कंपनीत गलेलठ्ठ पगाराची नोकरी करतानाच टार्गेटच्या सतत  मागे लागणारा व बायकोला वेळ न देणारा अक्षय, तर स्वतच्या करीयरमागे लागलेली, टीव्ही मालिकांमध्ये रमणारी नायिका. दोघांनी मूल जन्माला घालण्याचा निर्णय लांबणीवर टाकलाय, त्यातून लैंगिक संबंधाचे प्रश्न, अगदी मूल होणार नाही, ही शक्यता निर्माण होणे, मग दोघांनी परस्परापासून दूर जाणे, एकटेपण हे सारं नाटकात आहे. ही आजच्या युवा पिढीची व्यथा आहे. जोडप्यांमध्ये प्रेम आहे, पण रोमान्स संपला. व्यक्तिगत आणि सामाजिक आयुष्याचे संतुलन हरवलंय. अभिनेत्री स्पृहा जोशी आणि अभिनेता उमेश कामत यांची जोडी या नाटकात आपल्याला पहायला मिळते .
‘नाटकाचे २०० प्रयोग होणं हीच प्रेक्षकांची मोठी दाद आहे. हे नाटक लिहायला एक वर्ष लागलं आणि त्या नंतरच्या जवळपास दोन वर्षांत नाटकाचे २०० प्रयोग झाले. या नाटकाला येणारा प्रेक्षकवर्ग बहुतांशी तरूणच आहे. या नाटकानं आम्हाला हॅपी राहण्याचा एक मार्ग दाखवल्याची भावना प्रेक्षकांनी व्यक्त केली. एका जोडप्यानं घटस्फोटासाठी केलेला अर्ज मागे घेतल्याचं त्यांंनी भेटून सांगितलं. असे अनेक अनुभव या २०० प्रयोगांत अनुभवायला मिळाले. नाटक पुन्हा पुन्हा पाहणारेही अनेकजण आहेत. आम्हाला जे म्हणायचं होतं, ते नेमकेपणानं पोहोचतंय, याचीच ही पावती आहे. स्वाभाविकच नाटकाची टीम खूप खूश आहे’ असं नाटककार मिहीर राजदा यांनी सांगितलं.