जातीपातीचे चष्मे घरी ठेवून सैराट पाहू… सैराट होऊ
डेढ इश्किया सिनेमात नसीरुद्दीन शाह अरशद वारसीला प्रेमाचे सात पडाव सांगतात.. म्हणजेच प्रेमाच्या सात पायऱ्या… त्यातली पहिली पायरी म्हणजे. दिलकशी. आकर्षण. दुसरी उन्स. म्हणजे ओढ… तिसरी महोब्बत. म्हणजे प्रेम. चौथी अकीदत म्हणजे विश्वास. पाचवी इबादत म्हणजे पूजा. सहावी जुनून. सातवी आणि शेवटची म्हणजे मौत. अगदी थोडक्यात किंवा नेमकं सांगायचं तर हे सगळं म्हणजे सैराट. नागराज मंजुळेने दिलेला हा एक स्तब्ध करणारा अनुभव
कोणतेही चष्मे लावून पहायला हा काही थ्रीडी सिनेमा नाहीये. त्यामुळे तुम्ही जातीपातीचे चष्मे घरी सोडून आलात तर एक निरागस प्रेमकथा तुमच्या काळजाला चटका लावून जाईल. यात शंकाच नाहीए. बाकी मराठा दलित वगैरे या सगळ्या सपोर्टिव्ह गोष्टी आहेत. म्हणजे कुठलीही प्रेमकथा सरळ मार्गी जात नसतेच. तिने आडवळणं घेतली तरच त्यातला कैफ टिकतो. तो टिकावा. खुलावा. यासाठी या सगळ्या गोष्टी हातभार लावतात इतकंच.
सैराट ही एक छोट्या गावातली निरागस लव्ह स्टोरी. स्टोरी नाहीच मुळात. खरतंर अधूनमधून पेपरात झळकणारी एक चार ओळींची बातमी. पण एका संवेदनशील दिग्दर्शकाच्या प्रतिभेमुळे थेट काळजाला भिडणारी आणि शेवटच्या मिनिटात काळीज अक्षरशः पिळवटून टाकणारी.
सिनेमाची गोष्ट काहीशी अशीए- एका खेडेगावातली ही गोष्ट. गावातली पाटलाची मुलगी आर्ची… आणि तिचा वर्गमित्र पर्शा याचीं ही प्रेमकहाणी. कॉलेजच्या पहिल्या वर्षात शिकणारे हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात… आणि शेतात.. नदी तीरावर.. कुणाच्या नजरेआडे.. कुणाच्या नजरेसमोर.. त्यांचं प्रेम भरारी घेऊ लागतं… पुढे लव्ह स्टोरीत अपेक्षित असणारं वादळ येऊन धडकतं… आणि मग खऱ्या अर्थानं सुरु होते.. दोन जीवांची सैराट लव्ह स्टोरी… जी गावाच्या वेशी ओलांडून पुढे आपल्या हक्काच्या जगाच्या शोधात निघते… आपल्या हक्काच्या घराच्या शोधात. छोट्या छोट्या स्वप्नांचा खरंतर हा भलामोठा पाठलाग…
“आपलं नदीच्या काठी एक छोटं घर असायला पाह्यजे… झुळझुळ वाहणारं पाणी… पुढं अंगणात मोठी बाग… मी कामला जाईन.. मी स्वयंपाक करीन…मी लाकडं तोडून आणीन.. मी दारात उभी राहून तुझी वाट बघीन..” हा असा केवळ एकमेकांच्या सोबत राहण्यासाठीचा दोन जीवांचा भाबडा संघर्ष.
क्रिकेटमध्ये आपण गुडफिनीशर हा शब्द अगदी सहज, राजरोस वापरतो. तोच जर सिनेमाच्या बाबतीत वापरायचा झाला. तर नागराज हा नो दाऊट एक गुडफिनीशर ठरेल. फॅण्ड्री असो किवां मग सैराट. दोन्ही ठिकाणी दिग्दर्शक नागराज मुंजळेचं मूकभाष्य संबंध सिनेमाशी शेवटच्या मिनिटात अंतर्मुख व्हायला भाग पाडतं. वास्तवाच्या पाऊलखुळा मुक्याने सिनेमाच्या कॅनव्हासवर रेखाटणारा नागराज जर काहींना जातीयवादी वैगरे वाटत असले तर याहून दुसरं दुर्दैव नाही.
सिनेमा न बघण्याची असंख्य कारणं पुढे रेटली जातायत. रेटली जातील. पण प्रेम हे एकमेव कारण सैराट पाहण्यासाठी आणि सैराट होण्यासाठी पुरेसं आहे. सिनेमात एका ठिकाणी पर्शाचं वाक्यए… तुझ्यासारखं तंबाखू खात मरण्यापेक्षा आर्चीवर प्रेम करुन मरायला आवडेल मला… आवडलंय. चला जातीयवादाचे चष्मे घरी ठेवून सैराट पाहू. सैराट होऊ. गरजए.