मित्रांनो!, आज बॉलीवूडमधील एका सुवर्णयुगाचा अस्त झाला. हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते मोहमद युसूफ खान उर्फ दिलीपकुमार यांचे निधन झाले. ते ९८ वर्षांचे होते. त्यांना खारच्या हिंदुजा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. गेले अनेक दिवस ते आजारी होते. अखेर आज पहाटेस त्यांची प्राणज्योत मालवली.

या महान अभिनेत्याच्या सिनेसृष्टीतील कारकिर्दीवर प्रकाश टाकायचा झाल्यास, भारतीय चित्रपटांच्या इतिहासात अभिनयाचे विद्यापीठ अशा शब्दांत गौरवलेले तसेच ट्रॅजेडी किंग म्हणून प्रचलित असलेले ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार हे मुळचे पाकिस्तानमधील पेशावरचे. या शहरातील क्‍युसा खवानी बाजारातील पास्तुन कुटुंबात ११ डिसेंबर, १९२२ साली दिलीप कुमार यांचा जन्म झाला. त्यांचे मूळ नाव मोहम्मद युसूफ खान होते. त्यांचे वडील लाला गुलाम सरवर पेशावर व देवलाली येथील प्रसिद्ध फळविक्रेते होते.

दिलीप कुमार यांचे प्राथमिक शिक्षण नाशिकमधील देवलाली येथील प्रेस्टिजियस बर्नेस शाळेत झाले. १९३० साली त्यांचे संपूर्ण कुटुंब मुंबईत स्थायिक झाले. १९४० मध्ये दिलीप कुमार पुण्यातील एका कॅन्टीनचे मालक व फळविक्रेते होते. १९४३ साली बॉम्बे टॉकिजचे मालक आणि त्या काळातील लोकप्रिय अभिनेत्री देविका राणी आणि तिचा पती हिमांशु राय यांनी पुण्यातील आर्मी कॅन्टीनमध्ये दिलीप कुमार यांना पाहिले आणि त्यांनी १९४४ सालातील ज्वार भाटा या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी दिलीप कुमार यांची निवड केली. हा दिलीप कुमार यांचा पहिला चित्रपट.

ज्वारा भाटा चित्रपटाचे लेखक भगवतीचरण वर्मा यांनी त्यांचे युसुफ खान हे नाव बदलून दिलीप कुमार केले आणि तेव्हापासून ते दिलीप कुमार या नावाने ओळखू लागले. त्यांच्या ज्वार भाटा या चित्रपटाने रसिकांचे लक्ष वेधून घेतले नाही. मात्र १९४९ साली प्रदर्शित झालेल्या जुगनू या चित्रपटात त्यांनी नूरजहॉं यांच्यासोबत काम केले होते आणि त्यांचा हा पहिला गाजलेला चित्रपट.

त्यानंतर १९४८ च्या साहेब चित्रपटाने देखील बॉक्स ऑफिसवर जादू दाखवली. १९४९ साली महमूद खान दिग्दर्शित अंदाज चित्रपटात राज कपूर व नरगिस यांच्यासोबत ते लव ट्राएंगलमध्ये झळकले. त्यानंतर त्यांनी जोगन दीदार, दाग, देवदास, यहुदी आणि मधुमती यासारख्या ट्रायअँगल प्रेमकथेवर आधारीत असलेल्या चित्रपटामधून काम केले. रसिक प्रेक्षक त्यांना ट्रॅजेडी किंग या नावाने संबोधू लागले.

१९५२ च्या दाग चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेयरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पहिला पुरस्कार मिळाला आणि त्यानंतर पुन्हा एकदा हा पुरस्कार त्यांना देवदास चित्रपटासाठी १९५५ साली प्राप्त झाला. त्याकाळातील सर्व प्रसिद्ध अभिनेत्रींसोबत त्यांनी काम केले होते, या यादीत नरगिस, कामिनी कौशल, मीनाकुमारी, मधुबाला व वैजयंती माला या अभिनेत्रींचा समावेश आहे.

दिलीप कुमारने ट्रॅजेडी किंगची इमेज पुसून काढण्यासाठी स्वच्छ प्रतिमा असलेली एका आक्रमक शेतकऱ्याची भूमिका १९५२ च्या आन चित्रपटात निभावली आणि या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या चित्रपटानंतर अंदाज, नया दौर आणि कोहिनूर या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली होती. कोहिनूर चित्रपटातील भूमिकेसाठी पुन्हा एकदा फिल्मफेयरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.

१९६० साली के. आसिफ यांची मोठ्या बजेटचा ऐतिहासिक चित्रपट मुगल-ए-आजममध्ये राजकुमार सलीमची भूमिका निभावली होती आणि यात मधुबालाने दासी पुत्रीची भूमिका केली होती. त्याकाळात या चित्रपटातील जास्त भाग ब्लॅक ऍण्ड व्हाइटमध्ये चित्रीत केले होते. केवळ एक भाग रंगीतमध्ये शूट केला होता. चित्रपट बनल्यानंतर तब्बल ४४ वर्षांनंतर हा चित्रपट २००४ साली रंगीत व्हर्जनमध्ये तयार करून २००८ साली पुन्हा प्रदर्शित करण्यात आला आणि हिंदी चित्रपटाच्या इतिहासातील सर्वात हिट चित्रपट ठरला.

१९६१ साली दिलीप कुमार गंगा जमुना चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण केले होते. यात त्यांचा भाऊ नासिर खान मुख्य भूमिकेत होता. १९६२ साली ब्रिटीश दिग्दर्शक डेविड लेन यांच्या लॉरेन्स ऑफ अरबिया चित्रपटातील शरीफ अलीच्या भूमिकेसाठी त्यांना विचारण्यात आले होते, मात्र त्यांनी नकार दिला होता.

१९६४ मधील लीडर चित्रपटात उमर शरीफची भूमिका त्यांनी साकारली होती, मात्र हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला नाही. १९६७ साली राम और श्याम चित्रपटात ते डबल रोल मध्ये दिसले होते. १९७० सालानंतर त्यांच्या जीवनात अनेक चढउतार आले आणि १९८० मधील त्यांचे बरेचसे चित्रपट फ्लॉप ठरले होते. दास्ता, बैराग, गोपी आणि बंगाली चित्रपट सगीना महतो हे चित्रपट चाललेच नाहीत. म्हणून १९७६ ते १९८० काळात चित्रपटातून ब्रेक घेतला होता.

१९८१ साली मनोज कुमारच्या क्रांती चित्रपटातून त्यांनी पुन्हा सिनेइंडस्ट्रीत पुनरागमन केले आणि हा चित्रपट त्या वर्षातील सुपरहीट ठरला. १९८२ साली सुभाष घई यांच्या विधाता चित्रपटात अंडरवर्ल्ड डॉनची भूमिका केली होती. रमेश सिप्पी यांच्या शक्ती चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्या वडिलांची भूमिका केली होती. या भूमिकेसाठी १९८४ साली फिल्म फेयरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

१९८४ दिलीप कुमार यांनी रमेश तलवार यांच्या दुनिया आणि यश चोप्रा यांच्या मशाल चित्रपटात काम केले. १९८६ मध्ये सुभाष घई यांच्या कर्मा चित्रपटात काम केले आणि १९९१ मध्ये राजकुमार यांच्यासोबत दुसऱ्यांदा आणि सुभाष घई यांच्यासोबत सौदागर या चित्रपटात काम केले आणि हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता. १९९३ साली त्यांना फिल्मफेअरचा जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला.

दिलीप कुमार यांची जास्त गाणी मोहम्मद रफी यांनी गायली होती. १९५८ सालानंतर तलत महमूद आणि मुकेश यांनीसुद्धा त्यांच्यासाठी काही गाणी गायली. किशोर कुमार यांनी १९७४ साली सगीना चित्रपटातील साला मैं तो साहब बन गया हे गाणे गायले होते आणि हे गाणे खूप गाजले.

दिलीप कुमार राज्यसभेचे सदस्य होते. १९९४ साली त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच त्यांना पाकिस्तानातील सर्वोच्च पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले. हिंदी सिनेसृष्टीत सर्वात जास्त पुरस्कार प्राप्त केल्याचा विश्वविक्रम त्यांनी नोंदविला आहे.

दिलीप कुमार बरेच वर्षे अभिनेत्री मधुबालासोबत प्रेमसंबंध होते आणि त्यांना लग्नदेखील करायचे होते. मात्र त्यांच्या घरातून विरोध केला होता. त्यानंतर १९६६ साली ते त्यांच्यापेक्षा २२ वर्षे लहान सायरा बानो यांच्यासोबत लग्नबेडीत अडकले होते १९८१ साली दिलीप कुमार यांनी आसमा यांच्यासोबत दुसरे लग्न केले, मात्र हे लग्न जास्त काळ टिकू शकले नाही. मात्र सायरा बानू यांनी त्यांना अगदी शेवटपर्यंत साथ दिली.

स्टार मराठीच्या टीम तर्फे दिलीपकुमार यांना भावपूर्ण श्रद्धांजली…