गणेशोत्सवाची धामधूम आता ओसरली आहे, अनंत चतुर्दशीदेखील मोठ्या आनंदात नुकतीच पार पडली. मात्र गणेश विसर्जनानंतर समुद्र किनारी होत असलेल्या प्रदुषणाचे काय? ह्या प्रश्नाचे सामाजिक गांभीर्य ओळखून, बिगबॉस मराठी सीजन २ ची अंतिम स्पर्धक आणि संवेदनशील अभिनेत्री नेहा शितोळे हिने जुहू येथे समुद्र स़फाईचे कार्य केले. मुंबईतील सामाजिक संस्था अलर्ट सिटीजन फोरम, (रजि.) व नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस् महाराष्ट्र संयुक्तपणे द सोशल हूट यांच्या सहकार्याने जुहू येथे नुकतीच समुद्र किनारा सफाई मोहीम राबविण्यात आली होती, ह्या मोहिमेत सहभागी होत नेहाने आपला महत्वपूर्ण हातभार लावला.
लाखोंच्या संख्येने मुंबईतील जुहू बीच येथे घरगुती व सार्वजनिक बाप्पांचे विसर्जन केले जाते. मात्र समुद्र मानवनिर्मीत वस्तू कधीच त्याच्या पोटात ठेवत नाही, विसर्जन केलेल्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती, निर्माल्य आणि मुख्य म्हणजे पर्यटकांमार्फत आलेल्या प्लास्टिकमुळे मोठ्या प्रमाण समुद्र किनारे दरवर्षी प्रदूषित होत असतात! विसर्जनानंतर मोठ्या प्रमाणात जमा झालेले प्लास्टिक आणि निर्माल्य जमा करून महानगर पालिकेद्वारे योग्य ती विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न याद्वारे करण्यात आला. त्यासोबतच टीम आरे मध्ये मोठ्या प्रमाणात होत असलेल्या झाडांच्या तोडीचादेखील निषेध करत, नेहाने ‘आरे वाचवा’ ह्या बद्द्दल लोकांमध्ये जनजागृती काम केले आहे