दोन मित्र आणि त्यांची मैत्री…! या धाटणीचे अनेक सिनेमे आपल्याला पाहायला मिळतात. मैत्रीच्या याच विषयावर भाष्य करणाऱ्या सिनेमांत ‘अंड्या चा फंडा’ या आगामी चित्रपटाचादेखील समावेश होतो. अध्यास क्रिएशनचे विजय शेट्टी निर्मित आणि प्रशांत पुजारी तसेच इंदिरा विश्वनाथ शेट्टी सहनिर्मित या सिनेमाचे संतोष शेट्टी यांनी दिग्दर्शन व कथालेखन केले आहे. बालपणाच्या मैत्रीवर आधारित असलेल्या या सिनेमाचे पोस्टर पाहिले असता हा सिनेमा नक्कीच धम्माल आहे, हे लक्षात येते. या पोस्टरमधील अंडया आणि फंड्याच्या भूमिकेमध्ये अथर्व बेडेकर आणि शुभम परब हे दोन नावाजलेले बालकलाकार आपल्याला पाहायला मिळणार आहेत.
अथर्वने यापूर्वी ‘माय डियर देश’, ‘असा मी अशी ती’, ‘पोर बाजार’ यासारख्या चित्रपटात काम केले असून शुभमने ‘रईस’ या बॉलीवूड चित्रपटात काम केले आहे. शिवाय लवकरच येणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरच्या बायोपिकमध्येदेखील शुभम झळकणार आहे. अश्या या अभिनयात मुरलेल्या बालकलाकारांच्या ताफ्यात मृणाल जाधवचा देखील समावेश आहे. ‘लय भारी’. ‘तु ही रे’ तसेच हिंदीतील ‘दृश्यम’ या चित्रपटातून रसिकांच्या पसंतीस उतरलेली ही चिमुरडी ‘अंड्या चा फंडा’ मध्ये काय कमाल करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
त्याचप्रमाणे दिग्दर्शक संतोष शेट्टी यांची पार्श्वभूमीदेखील कौतुकास्पद आहे. त्यांनी गेली अनेक वर्ष सीआयडी आणि आहट यांसारख्या मालिकांचे लिखाण आणि दिग्दर्शन केले असून, या सिनेमाच्या माध्यमातून ते प्रथमच मराठीत दिग्दर्शकीय पदार्पण करीत आहे. शेवटपर्यंत सस्पेन्स खेळवत ठेवणे आणि प्रेक्षकांना विचार करायला लावणे हा त्यांचा हातखंडा. या चित्रपटातदेखील त्यांची हीच शैली आपल्याला पाहायला मिळणार आहे. तसेच अंबर हडप, गणेश पंडित आणि श्रीपाद जोशी या त्रिकूटाने मिळून सिनेमाची पटकथा आणि संवादाची धुरा सांभाळलेली असल्यामुळे ‘अंड्या चा फंडा’ या चित्रपटामधून दर्जेदार लेखनाची गम्मत पाहायला मिळणार आहे. सस्पेन्सची परिपूर्ण मेजवानी असलेला हा सिनेमा मैत्रीचा कोणता फंडा लोकांसमोर घेऊन येणार आहे, ते येत्या ३० जूनला सिनेमा प्रदर्शित झाल्यावरच कळेल.