बिग बॉस मराठीच्या दुस-या पर्वात वाइल्ड कार्ड एन्ट्री घेतलेल्या ‘रेगे’ फेम अभिनेता आरोह वेलणकरने समाजसेवा करतानाचे काही अनुभव बिग बॉसच्या घरच्यांशी बोलताना शेअर केले. बिग बॉस मराठीच्या अनसीन अनकट व्हिडीओमध्ये दिव्यांगांच्या असामान्य कर्तृत्वाच्या यशोगाथा आरोहने सांगितल्या.आरोह वेलणकर म्हणाला, “मी ज्या दिव्यांगांच्या संस्थेसोबत काम करतो. त्या संस्थेसोबत काम करताना दिव्यांगांच्या असमान्य कर्तृत्वाची अनेक उदाहरणं पाहायला मिळाली आहेत.
एका इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांचा डान्स करताना अपघात झाला. ह्या अपघातात तो मानेखालचे शरीर निकामी होऊनही न डगमगता त्याने इंजिनिअरिंग पूर्ण करून आता एक वेबसाइट सुरू केली आहे. मला भेटलेल्या अशा अनेक असामान्य व्यक्तिंमध्ये अपघातात एमए इकॉनोमिक्स असलेला अपघातग्रस्त टॅक्सीचालक, संपूर्ण अंध असलेल्या एका महिला वकिलाची आणि पाय नसलेल्या बॉडीबिल्डर मि.ऑलिम्पियाची यशोगाथा मला भारावून टाकणारी होती.”
सुत्रांच्या अनुसार, अभिनेता आरोह वेलणकर निरनिराळ्या सामाजिक संस्थांसोबत संलग्न आहे. ‘आय व्होट’ ह्या जनजागृती मोहिमेतून त्याने नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणूकांमध्ये मतदान करण्यासाठी प्रोत्साहन दिले होते. तसेच ‘माय होम इंडिया’ ह्या सामाजिक एकात्मतेसाठी काम करणा-या संस्थेसोबतही तो संलग्न आहे. माय होम इंडियाच्या ‘सपनों से अपनों तक’ ह्या मोहिमेत त्याचा सक्रिय सहभाग होता. बिग बॉसमध्ये आरोहने नुकतेच काही हृदयस्पर्शी अनुभव सांगितले. हे अनुभव त्याला ‘नुतन गुळगुळे फाउंडेशन’ सोबत काम करताना आले होते. ह्या समाजसेवी संस्थेव्दारे काम करताना त्याला दिव्यांगाच्या असामान्य प्रतिभेची अनुभूती आली.
आरोहला जेव्हा जेव्हा चित्रीकरणातून किंवा नाटकांच्या प्रयोगांमधून वेळ मिळतो तेव्हा तो सामाजिक कार्यामधे स्वतःला गुंतवतो.