वर्ष १९८९. विधू विनोद चोप्राचा एक चित्रपट आला. ‘परिंदा’. तो एक मास्टरपीसअसल्याचे सिद्ध झाले. विधूच्या याच चित्रपटाने संजय लीला भन्साळी यांनी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले होते. भन्साळी विधुला ‘परिंदा’ साठी असिस्ट करत होते. या चित्रपटातील क्लासिक सॉंग ‘तुमसे मिलके’ या चित्रपटात एक गाणं भन्साळी यांनी दिग्दर्शित केले होते. भन्साळीने नंतर विधुच्या ‘1942: अ लव्ह स्टोरी’ या चित्रपटासाठीही असिस्ट केले.

१९९६ मध्ये भन्साळीने स्वतःचा स्वतंत्रपणे ‘खमोशी: द म्युझिकल’. बनविला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अजिबात कमाई केली नाही. पण टीकाकारांना तो फारच आवडला. अगदी सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी समीक्षकांचा फिल्मफेअर पुरस्कारही देण्यात आला.

‘खामोशी’ ची प्रशंसा केली गेली परंतु या चित्रपटाने भन्साळी ज्या सुपरहिट यशाच्या शोधात होता ते यश मिळवू शकला नाही. मात्र त्याची ही इच्छा त्याच्या पुढच्या चित्रपटाने पुरेपूर पूर्ण केली. “हम दिल दे चुके सनम”. सन १९९९ मध्ये रिलीज झालेला हा चित्रपट त्यावर्षीच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक होता. फिल्मफेअर पुरस्कारांच्या १७ श्रेणींमध्ये नामांकित. सिनेमॅटोग्राफी, नृत्यदिग्दर्शन, प्रॉडक्शन डिझाईन आणि संगीत दिग्दर्शनासाठीही या चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कार जिंकले.

यंदा नुकतेच १८ जून २०२१ रोजी ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाला २२ वर्षे पूर्ण झाली. आज आपण ‘हम दिल दे चुके सनम’ संबंधित काही रंजक किस्से जाणून घेऊया.असे म्हटले जाते की या फिल्मची स्टोरी ‘वो साथ दिन’ ने प्रेरित होती. योगायोगाने यंदा २३ जून २०२१ रोजी वो सात दिनने सुद्धा ३८ वर्ष पूर्ण केलेत.

ऐश्वर्याच्या अलौकिक डोळ्यांनीच दिली होती तिला या चित्रपटाची ऑफर. ऐश्वर्याचे डोळे कोणाला आवडत नाहीत? पण तिच्या याच डोळ्यांचा ‘हम दिल दे चुके सनम’ शीही संबंध आहे हे काही मोजक्याच लोकांना माहिती आहे. तो कसा हे जाणून घेण्यासाठी, आपल्याला १९९६ मध्ये जावे लागेल. आमिर खान, करिश्मा कपूर स्टारर ‘राजा हिंदुस्तानी’ या सिनेमाची स्क्रीनिंग होती. चित्रपटाच्या प्रदर्शनात हिंदी चित्रपटसृष्टीशी संबंधित अनेक दिग्दर्शक आणि कलाकार उपस्थित होते. संजय लीला भन्साळी हेही त्यांच्यात होते. चित्रपट संपला. भन्साळी यांच्यासह चित्रपट पाहणारे मान्यवर लोक लॉबीत आले.

अचानक तिथे एक मुलगी भन्साळी यांच्या समोर आली अन म्हणाली, “हाय, मी ऐश्वर्या राय आहे. मला तुमचा “खामोशी” प्रचंड आवडला. भन्साळीने ऐश्वर्याशी शेकहॅन्ड केला खरा पण त्याची नजर ऐश्वर्याच्या डोळ्यांत अडकली. नेमके त्याच काळात भन्साळी ‘हम दिल दे चुके सनम’ या कथेवर काम करत होते. नंदिनीची भूमिका साकारण्यासाठी अभिनेत्री शोधत होते. ऐश्वर्याला पाहून त्याने स्वत: ला सांगितले की हीच तर माझी नंदिनी आहे. फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत स्वत: भन्साळींनी ही गोष्ट सांगितली.

चित्रपटाचे ‘निंबुडा निंबुडा’ गाणे आठवते? जेथे वनराज नंदिनीला पहिल्यांदा नाचताना पाहतो. त्या गाण्याचे शूटिंग होण्यापूर्वी नेमकी ऐश्वर्याच्या पायाला दुखापत झाली होती. ज्यामुळे तिचा पाय सुजला होता. पण अशा स्थितीतही ऐश्वर्याने सर्वोत्तम परफॉर्मन्स दिला.आता नंदिनीचा तो इंट्रो सीन आठवा. जिथे ती वाळवंटात पळत आहे. भन्साळी यांनी सांगितले की, त्याने ते दृश्य कच्छच्या वाळवंटात शूट केले होते. जेथे अतिशय उष्ण तापमान होते, मात्र त्या दृश्यासाठी ऐश्वर्या त्या तापलेल्या वाळवंटात अनवाणी धावली. भन्साळी आणि ऐश्वर्याची जोडी फक्त येथेच थांबली नाही. पुढे जाऊन त्यांनी भन्साळी दिग्दर्शित ‘देवदास’ आणि ‘गुजारिश’ या चित्रपटातही काम केले.

‘हम दिल दे चुके सनम’ मधील समीर झालेल्या सलमानला वडील नव्हते. पण तो आपल्या वडिलांच्या जवळ दाखवला होता. काही खास आनंद शेअर करायचा असेल किंवा दु:खामध्ये बुडलेला असेल, आकाशात हात वर करुन आपल्या वडिलांशी बोलायचा. सलमानच्या अशा दृश्यांचे कौतुकही झाले. पण या दृश्यांचा संजय लीला भन्साळीशी थेट संबंध होता. भन्साळीच्या वडिलांचे निधन झाले तेव्हा भन्साळी लहान होते. त्यांचे बालपण एकाकीपणामध्ये गेले. जेव्हा जेव्हा तो घरी एकटाच असायचा आणि त्याच्या वडिलांची आठवण काढायचा तेव्हा तो असाच आकाशाकडे पाही आणि वडिलांशी बोलू लागे. जणूकाही त्याच्या वडिलांना त्याच्या मनातील सर्वकाही समजत असावे.

चित्रपटात सलमानने समीरची भूमिका साकारली होती. जो नंदिनीच्या प्रेमात आहे. पण नंदिनीचे वडील सहमत नाहीत आणि ते दोघे वेगळे होतात. नंदिनीचे थेट वनराजशी लग्न झाले. जे तिला अजिबात आवडत नाही. वनराजला नंदिनी आणि समीरबद्दल माहिती मिळाते. तो दोघांमध्ये समेट करण्याचा प्रयत्न करतो. पण शेवटी, नंदिनीने समीरऐवजी वनराजची निवड केली. कथेत असे दर्शविले गेले होते की त्याने आपले कर्तव्य आपल्या प्रेमापेक्षा जास्त मानले आहे. चित्रपटाच्या या एंडिंगबद्दल सलमान बिलकुल खूष नव्हता. शेवटी नंदिनीने तिचे खरे प्रेम निवडावे अशी त्याची इच्छा होती. त्याने भन्साळी यांना तसे सांगितलेही. पण भन्साळी त्याच्याशी सहमत नव्हते.

सलमानने त्यावेळी सूरज बड़जात्याचीही मदत घेतली होती. जेणेकरून तो भन्साळीला समजावून शेवट बदलण्यास दबाव आणू शकेल. सूरज सुद्धा भन्साळी यांच्याशी सुमारे दीड तास बोलले. कर्तव्यासमोर प्रेम कसे श्रेष्ठ आहे हे स्पष्ट केले. भन्साळी ऐकत राहिले. संभाषण संपल्यानंतर त्यांनी नम्रपणे सर्वांचीच सूचना नाकारली.चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान सलमान आणि ऐश्वर्या एकमेकांना डेट करत होते. असे म्हटले जाते की यामुळे सलमानला कदाचित शेवट बदलण्याची इच्छा असू शकते.

अजय देवगनने चित्रपटात वनराजची भूमिका साकारली होती. पण या भूमिकेसाठी अजय कधीही पहिली पसंती नव्हता. अजयच्या आधी भन्साळीने आमिर, शाहरुख, संजय दत्त, अनिल कपूर आणि अक्षय कुमार यांची नावेही फायनल केली होती. त्यांच्याकडेही संपर्कही साधला. पण कुठेही काही पॉझिटिव्ह घडले नाही आणि सर्वत्र फिरल्यानंतर, ही भूमिका अजयकडे आली.

समीर इटलीचा आहे. व्यवसायाने गायक. शास्त्रीय संगीत शिकण्यासाठी भारत येतो. जेव्हा त्याच्याशी नंदिनीचे लग्न झाले नाही, तेव्हा तो इटलीला परतला. मग वनराज आणि नंदिनीसुद्धा त्याला शोधण्यासाठी इटलीला पोहोचतात. हे चित्रपटात दाखवण्यात आले होते. पण चित्रपटात दाखविलेली इटली खरी इटली नसून ती होती हंगेरीची राजधानी बुडापेस्ट. त्यावेळी इंटरनेट नव्हते, म्हणून जे काही दाखविले होते ते सर्वांनी स्वीकारले. त्यानंतर इंटरनेट आले आणि लोकांनी चित्रपटाला ट्रोल करण्यास सुरुवात केली.