टीव्ही मालिकांतून लोकप्रिय ठरलेला अभिनेता आशुतोष पत्की एका महत्त्वपूर्ण चित्रपटातून मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. शहीद भाई कोतवाल या चित्रपटात तो शहीद भाई कोतवाल यांच्या भूमिकेत दिसणार असून, हा चित्रपट २४ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.
ब्रिटिशांविरुद्धच्या सशस्त्र लढ्यात वीरमरण पत्करलेले माथेरानचे भूमिपुत्र विठ्ठल लक्ष्मण उर्फ भाई कोतवाल यांच्या स्मृतिदिनी आज त्यांच्या धाडसाला वंदन करणाऱ्या ‘शहीद भाई कोतवाल’ या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आले.
स्वरजाई आर्ट मीडिया प्रॉडक्शनच्या प्रवीण दत्तात्रेय पाटील, एकनाथ महादू देसले यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. सिद्धेश एकनाथ देसले, सागर श्याम हिंदुराव चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. तर एकनाथ देसले आणि पराग सावंत यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटाचं पहिलं पोस्टर नुकतंच सोशल मीडियाद्वारे प्रसिद्ध करण्यात आलं.
आशुतोष पत्की ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांचा मुलगा आहे. वडिलांपेक्षा वेगळी वाट धरत त्यानं अभिनेता म्हणून ओळख निर्माण केली आहे. आता शहीद भाई कोतवाल या चित्रपटातून त्याला पहिल्यांदाच ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे त्याच्या या भूमिकेविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.
या चित्रपटात त्याच्यासह अभिनेते अरुण नलावडे, गणेश यादव, पंकज विष्णू, कमलेश सावंत, मिलिंद दस्ताने, सिद्धेश्वर झाडबुके, श्रीरंग देशमुख, अभय राणे, परेश हिंदुराव अभिनेत्री ऋतुजा बागवे, निशिगंधा वाड, माधवी निमकर आदी कलाकारांच्या महत्वपूर्ण भूमिका आपल्याला पहायला मिळणार आहेत.