चीनमधून कोरोना व्हायरस जगभर पसरत भारतातही पोहोचला. या जीवघेण्या महामारीने ‘लॉकडाऊन’ ची सक्ती लादली. सर्वकाही बंद. शुटिंग्स व थिएटर्स बंद झाल्यामुळे चित्रपटसृष्टी हवालदिल झाली. मार्च-मध्यापासून जून-जुलै मध्ये प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांचे वेळापत्रक डळमळले. लोकं घरी राहून टीव्हीवर तेच-तेच प्रोग्रॅम्स बघण्यापेक्षा ‘ओटीटी’ वरील चित्रपट व शोज ना पसंती देऊ लागले त्यामुळे काही निर्मात्यांनी आपले नवे चित्रपट डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचे घोषित केले. काही नवीन-जुने मराठी चित्रपटही डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होताहेत ज्यात शशांक केतकर अभिनित ‘आरॉन’ चा समावेश आहे. ‘होणार सून मी त्या घरची’ मधला ‘श्री’ म्हणजेच शशांक केतकर म्हणता म्हणता महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनला. वन वे तिकीट व ३१ दिवस सारख्या चित्रपटांमधून दिसलेला शशांक केतकर ‘आरॉन’ मधून एकदम वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे.
जगभरात फ्रान्समधील पॅरिस हे शहर सर्वात ‘रोमँटिक’ शहर म्हणून ओळखले जाते. म्हणूनच अनेक चित्रपटांचे, हिंदी सुद्धा, चित्रीकरण तेथे झाले आहे. परंतु पहिल्यांदाच एखाद्या मराठी चित्रपटाचे चित्रीकरण पॅरिस मध्ये झाले आहे. आगामी मराठी चित्रपट ‘आरॉन‘ याचे बहुतांश चित्रीकरण फ्रान्समध्ये झाले असून त्या देशात घडणारी कथा या चित्रपटातून मांडण्यात आली आहे. दिग्दर्शकाने बालक व पालकांच्या मनोविश्वावर आधारित या कथानकाला हळुवारपणे हाताळत चित्रपटाच्या रंजकतेत भर टाकलीय.
भारतीय चित्रपटांत आई मुलाच्या नात्याला अनन्यसाधारण महत्व दिलं गेलं आहे कारण आयुष्यात तेच एक नातं असं आहे जे इतर सर्व नात्यांच्या वर आहे. कुठल्याही मातेला आपले मूल जगातील सर्वश्रेष्ठ अपत्य वाटत असते. त्यातील भावनिक गुंतागुंत अजूनही हृद्य वाटत असते. असंच नात्यांचं मोहोळ असलेला ‘आरॉन’ हा चित्रपट आहे. लेखक दिग्दर्शक ओमकार शेट्टी यांनी, जन्म देणारी आई व लहानाचं मोठं करणारी आई, याच्या भावविश्वात अडकलेल्या षोडशवर्षीय मुलाची कहाणी या चित्रपटातून मांडली आहे. साहजिकच एक वेगळ्या प्रकारच्या प्रेमाचा त्रिकोण या चित्रपटातून बघायला मिळतो. यामुळे चित्रपटातील भावनिक गुंतागुंतीला वेगळीच धार चढलीय. त्यातच ही कहाणी बराच काळ पॅरिस मध्ये घडते त्यामुळे सिनेमाचा प्रविशाल प्रकार उठून दिसतो. बऱ्याच अंशी यात प्रवासयात्रा जरी असली तरी दिग्दर्शकाने व्यक्तिरेखांच्या मानसिक प्रवासाचे चित्रणही उत्तम प्रकारे केले आहे. अजूनही महत्वाचे म्हणजे तो पॅरिसमधल्या नामांकित स्थलदर्शनामध्ये अडकून न पडता त्या शहराच्या पोटात शिरून आपली कथा पुढे नेत राहतो.
‘आरॉन‘ चित्रपटाची निर्मिती गिरीश नारायण पवार, कौस्तुभ लटके, अविनाश अहेर यांनी केली असून ओमकार रमेश शेट्टी यांनी दिग्दर्शनाची धुरा वाहिली आहे. ‘होणार सून ….’ फेम शशांक केतकर, ‘पोश्टर बॉईझ/गर्ल’ फेम नेहा जोशी व ‘उंबटु’ फेम अथर्व पाध्ये यांच्या ‘आरॉन’ मध्ये प्रमुख भूमिका आहेत. त्याचप्रमाणे बंगाली चित्रपटांमधील सुपरस्टार स्वस्तिका मुखर्जी ने ‘आरॉन’ द्वारे मराठी चित्रपटात पदार्पण केले आहे.
तर रसिकहो, जर का तुमचा ‘आरॉन’ पाहायचा राहून गेला असेल किंवा पुन्हा पाहून आपला चित्ररंजनाचा आनंद द्विगुणित करायचा असेल तर, तो आता नक्की पहा ऍमेझॉन प्राईम व्हिडीओ वर.