Ghuma 2016 ,Half Ticke 2016 ,Kaasav 2016,Dashkriya 2016 ,Vazandar2016 ,Ventilator 2016 ,Kiran Kulkarni vs Kiran Kulkarni 2016 ,Guru 2016
सतरावा संस्कृती कलादर्पण गौरव रजनी चित्रपट महोत्सव जाहिर
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात लोकप्रिय झालेल्या संस्कृती कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळ्याने यंदा सतराव्या वर्षात पदार्पण केले आहे. रंगभूमी, चित्रपट आणि मालिका अशा तिन्ही विभागातील कलाकृतींचा आणि कलावंतांचा सन्मान करणारा हा पुरस्कार सोहळा असून, यावर्षी झालेल्या चित्रपट विभागातील अंतिम निवड प्रक्रियेत एकूण ११ चित्रपटांची यादी जाहीर करण्यात आली आहे. हे सर्व चित्रपट प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरात दि. १८ आणि दि. १९ एप्रिल रोजी होत असलेल्या १७ व्या संस्कृती कलादर्पण गौरव रजनी चित्रपट महोत्सवामध्ये दाखवले जाणार आहेत.
सालाबादप्रमाणे होत असलेल्या या चित्रपट महोत्सवासाठी घुमा, कासव, नाती खेल, माचीवरला बुधा, व्हेंटीलेटर, हाफ तिकीट, दशक्रिया, वजनदार, गुरु, पोस्टर गर्ल, किरण कुलकर्णी वर्सेस किरण कुलकर्णी या अंतिम ११ चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. ज्यात गुरु, पोस्टर गर्ल आणि किरण कुलकर्णी वर्सेस किरण कुलकर्णी हे तीन चित्रपट काही तांत्रिक कारणास्तव दाखविले जाणार नाहीत.
यंदाच्या १७ व्या संकृती कलादर्पण गौरव रजनी २०१७ च्या चित्रपट महोत्सवाची सुरुवात ‘दशक्रिया’ या चित्रपटाने होणार असून, हे सारे चित्रपट रसिकांना ५० रूपये या माफक दरात पाहण्याची संधी मिळणार आहे. तसेच या महोत्सवाच्या निमित्ताने प्राथमिक निवड झालेल्या कलाकृतींच्या कलाकार मंडळींसोबत खेळ पाहण्याची सुवर्णसंधी प्रेक्षकांना मिळत असून परीक्षकांसोबत मतदान करण्याची संधी देखील प्राप्त होणार आहे.
यंदाच्या पुरस्कार सोहळ्यासाठी चित्रपट विभागांसाठी सन्माननीय परीक्षक म्हणून,मिलिंद गवळी, अमित भंडारी, रमेश मोरे, राजीव पार्सेकर, सुशांत शेलार आणि समृद्धी पोरे यांनी धुरा संभाळली असून, एकूण ४७ चित्रपटांपैकी अंतिम ११ चित्रपटांची निवड करण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर होते. या विभागात प्रथम येणाऱ्या कलाकृतीला बक्षीस रोख रक्कम रुपये दीड लाख रुपये असणार आहे. तसेच दोन्ही प्रमुख विभागातील संबंधित इतर सहाय्यक विभागातील विजेत्यांना संस्कृती कला दर्पण गौरव रजनीचे सन्मान चिन्ह बहाल करण्यात येणार आहे, असे संस्थेचे अध्यक्ष आणि संस्थापक चंद्रशेखर सांडवे व अध्याक्षा अर्चना नेवरेकर यांनी माहिती दिली,