सुप्रसिद्ध अभिनेता भूषण प्रधान तसेच प्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांच्यावर चित्रित झालेला “अजिंक्य” गतवर्षी प्रदर्शनाच्या मार्गावर असताना कोरोनाने संपूर्ण जगावर संकट उभे केले. परंतु आता परिस्थिती पूर्ववत होत असल्या कारणाने महाराष्ट्र सरकारने चित्रपट प्रदर्शनाला परवानगी दिली आहे. ल्युमिनरी सिने वर्ल्ड आणि एक्झॉटेक मीडिया प्रा. लि.यांनी “अजिंक्य” सिनेमा येत्या १९ नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे याची हॅशटॅग “अजिंक्य आला रे” असे म्हणत सोशल मीडियाद्वारे घोषणा केली आणि पुन्हा एकदा “अजिंक्य” या सिनेमाची चर्चा होतं असताना दिसत आहे.
तरुणाईची नेमकी नस ओळखून ज्वलंत विषयावर भाष्य करणारा अजिंक्य सिनेमा येत्या १९ नोव्हेंबर २०२१ रोजी प्रदर्शित होत आहे. आधुनिकतेच्या आणि प्रगतीच्या वेगवान प्रवाहात स्वार असणाऱ्या आजच्या पिढीचं प्रतिनिधित्व करणारा नायक ”अजिंक्य”च्या संघर्षावर बेतलेला हा सिनेमा आहे. अभिनेता भूषण प्रधान व अभिनेत्री प्रार्थना बेहेरे हे दोघेही या सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदा एकत्र येणार आहेत. त्याप्रमाणेच जेष्ठ अभिनेते उदय टिकेकर, अरुण नलावडे, गणेश यादव, अनिकेत केळकर, प्रसाद जवादे, पद्मनाभ बिंब, त्रियुग मंत्री, अभिनेत्री वंदना वाकनीस आणि पल्लवी पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ल्युमिनरी सिने वर्ल्ड निर्मित आणि एक्झॉटेक मीडिया प्रा. लि. प्रस्तुत ”अजिंक्य” चे निर्माते अरुणकांत शुक्ला, नीरज आनंद, राघवेंद्र के. बाजपेयी, बाबालाल शेख, राहुल लोंढे आणि वेद पी. शर्मा हे असून उमेश नार्वेकर सिनेमाचे कार्यकारी निर्माते आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन अ. कदिर यांनी केलं आहे तसेच चित्रपटाची कथा, पटकथा, संवाददेखील अ. कदिर यांचेच आहेत. दिग्दर्शक अ. कदिर यांचा हा पहिलाच प्रयत्न असून सांगली जिल्ह्यातील जत या शहराचा तसेच मुंबई, पुणे, कोल्हापूर मार्केटयार्ड या सर्व ठिकाणांचा त्यांनी सिनेमाच्या चित्रीकरणात उत्तम वापर करून घेतला आहे.
गेल्या वर्षी या चित्रपटाच्या प्रदर्शनाला कोरोनामुळे जरी स्थगिती मिळाली असली तरी आता सगळं काही पूर्ववत आल्यानंतर चित्रपटाचे निर्माते तसेच दिग्दर्शक प्रदर्शनासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत. “शहरी आणि ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या जाणवणारी तफावत प्रखरतेने मांडणारा चित्रपट म्हणजे अजिंक्य हा होय. चित्रपट दिग्दर्शनाचा हा माझा पहिलाच अनुभव असल्यामुळे मला यातून खूप अपेक्षा आहेत” असे चित्रपटाचे दिग्दर्शक अ. कदिर या निमित्ताने सांगतात. तसेच “या चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी जितकी आव्हाने आली त्याच्या दुप्पट चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या वेळी आली, एक निर्माता म्हणून आम्हाला सर्व बाबींचा विचार करावा लागतो आणि म्हणूनच आम्ही महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाचा आदर करतो” असे चित्रपटाचे निर्माते नीरज आनंद म्हणतात.
रोहन- रोहन या जोडीने चित्रपटाला संगीत दिले आहे. गीतकार किरण कोठावडे लिखित ”अलगद अलगद” हे गाणे रोहन प्रधान आणि मीनल जैन यांनी गायले असून सदर गाण्याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. तसेच, गायक रोहन गोखले यांच्या दमदार आवाजातील ”स्वप्नांना..” हे प्रोत्साहनपर गीत एक नवी ऊर्जा देणारं गाणं आहे. शिवाय आजच्या पिढीतलं “माझे फेव्हरेट राव” हे आयटम सॉंग प्रेक्षकांना ताल धरायला लावेल यात काही शंका नाही. मनाला भिडेल असं ”आता तरी बोल ना” हे भावनिक गाणं मनोज यादव यांनी लिहिलेलं असून गायक सुरज जगन आणि स्वप्नील बांदोडकर यांच्या आवाजात ऐकायला मिळणार आहे.
भूषण प्रधान आणि प्रार्थना बेहरे या दोघांना चित्रपटगृहात नव्या भूमिकेत बघणे ही प्रेक्षकांसाठी पर्वणीच ठरू शकेल. येत्या १९ नोव्हेंबर २०२१ रोजी संपूर्ण महाराष्ट्रभरात चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे.