मित्रानो! सध्या झी मराठीवरील प्रचंड गाजलेली मालिका कारभारी लयभारी प्रेक्षकांनचा निरोप घेत आहे, याच जागी तेजपाल वाघ यांचीच नवीन मालिका ‘मन झालं बाजींद’, प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विशेष बाब म्हणजे या मालिकेत आता तुम्हाला सैराट फेम सल्या आणि बाळ्या आपल्याला पाहायला मिळणार आहेत. सल्याची भूमिका साकारणारा अभिनेता अरबाज शेख आणि बाळ्याची भूमिका साकारणारा अभिनेता तानाजी गलगुंडे हे दोन्ही कलाकार सैराट चित्रपटामुळे खूप जास्त गाजले.

मराठी चित्रपटाचा इतिहास सुवर्ण अक्षरात कोरणारा चित्रपट म्हणजे सैराट. या चित्रपटातील सर्वच पात्रांनी प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली. या चित्रपटात परश्याची पुरेपूर साथ देणारे त्याचे दोन मित्र बाळ्या आणि सल्या यांच्या लक्षवेधी भूमिका प्रेक्षक अजूनही विसरले नाही आहेत. हीच जोडी आता छोट्या पडद्यावर झळकणार आहे. त्यांच्या व्यक्तिरेखेबद्दलची माहिती अजून गुलदस्त्यात असली तरी पण हे दोघे छोट्या पडद्यावर देखील आपल्या तुफान अभिनय कौशल्याने प्रेक्षकांचं भरघोस मनोरंजन करणार यात शंकाच नाही.

आजवर मालिकांमध्ये प्रेमाचा रंग गुलाबी असलेला आपण पाहिलाय. परंतु पहिल्यांदाच मन झालं बाजिंद या मालिकेत राया आणि कृष्णाच्या प्रेमकथेत पिवळ्या रंगाची उधळण आपल्याला पहायला मिळणार आहे. या मालिकेत कृष्णा आणि राया सोबत आता बाळ्या आणि साल्या देखील प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज होणार आहेत. या मालिकेतून अभिनेता वैभव चव्हाण आणि अभिनेत्री श्वेता राजन हे दोघे पहिल्यांदाच मुख्य भूमिकेतून प्रेक्षकांना भेटणार आहेत.

या मालिकेचे दिग्दर्शन अनिकेत साने यांनी केलेले असून वाघोबा प्रॉडक्शन यांनी या मालिकेच्या निर्मीतीची धुरा सांभाळली आहे. श्वेता खरातने या अगोदर ‘राजा राणीची गं जोडी’, मधून कलर्स मराठीवर पदार्पण केले होत. पण मन झालं बाजींद या मालिकेत ती मुख्य भूमिका साकारणार आहे. याआधी वैभव चव्हाण याने स्वराज्यजननी जीजामाता या मालिकेत विरोधी भूमिका निभावली होती. त्याच बरोबर त्याने अगोदर नाटकात संभाजी महाराजांची भूमिका साकारली होती.

सैराट नंतर तानाजी गस्त आणि फ्री हिट दणका या चित्रपटात दिसला होता तर अरबाज या अगोदर तुम्हाला सैराट नंतर फ्री हिट दणका यात दिसला होता. आता ही जोडी मन झालं बाजींद या मालिकेतून प्रेक्षकांना भेटायला येत आहे. आमच्या टीम स्टार मराठी तर्फे भावी वाटचालीसाठी या मालिकेची टीम तसेच तानाजी आणि अरबाज यांना खूप साऱ्या शुभेच्छा!!!…