अमिताभ बच्चन यांच्या जुहूस्थित ‘प्रतीक्षा’ या आलिशान बंगल्यावर लवकरच बीएमसीचा हातोडा पडणार आहे. संपूर्णपणे नाही, परंतु बंगल्याच्या समोरील मोठा भाग तोडला जाणे आवश्यक आहे, जेणेकरून त्यासमोरून जाणाऱ्या रस्त्याची रुंदी वाढवता येईल. २०१७ मध्ये बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) यांनी बच्चन यांच्यासह त्या भागात राहणाऱ्या सर्व लोकांना या प्रकरणात नोटीस पाठविली होती. त्यानंतर बच्चनच्या सर्व शेजाऱ्यांनी रस्त्यासाठी आपली जमीन देण्याचे मान्य केले. पण बच्चन कुटुंबियांकडून बीएमसीला कधीच आश्वासक उत्तरे मिळाली नाहीत. आता मात्र बीएमसी अमिताभ बच्चन यांची प्रॉपर्टी तोडणार आहे.
संत ज्ञानेश्वर मार्गाची रुंदी वाढवता यावी यासाठी हा तोडफोडीचा कार्यक्रम हाती घेण्यात येत आहे. हा रस्ता चंदन सिनेमा क्षेत्रास लिंक रोडला जोडतो. सध्या तो रस्ता ४५ फूट रुंद आहे, यामुळे त्यावर दररोज वाहतुकीची कोंडी होते. आता त्या रस्त्याची रुंदी ६० फूट वाढवावी लागेल. तो संपूर्ण रस्ता तयार झाला आहे, आता फक्त अमिताभ बच्चन यांचा बंगला प्रतीक्षासमोरचेच काम बाकी उरलेले आहे.
२०१७ मध्ये नोटीस पाठविल्यानंतर महापालिकेने सर्व अतिक्रमीत घरे पाडली होती. फक्त बच्चन आणि त्यांचे शेजारी के.व्ही. सत्यमूर्तीचा बंगला उरला होता. २०१९ मध्ये सत्यमूर्तीचा बंगलाही पाडण्यात आला. पण अमिताभ यांच्या बंगल्याला कोणीही स्पर्शही केला नाही. मग सत्यमूर्ती यांनीही याबाबत बरीच खळबळ माजवली. तरीही तेव्हापासून ती बाब तिथेच अडकली होती. पण आता हा मुद्दा कॉंग्रेसचे नगरसेवक ट्यूलिप मिरांडा यांनी उपस्थित केला आहे.
ट्यूलिप मिरांडा यांनी के-वेस्ट प्रभागाला या विषयावर पत्र पाठवताना म्हटले आहे की, बीएमसी मुद्दाम अमिताभची संपत्ती पाडण्यास उशीर करीत आहे. त्याने आपल्या तक्रारीत लिहिलेय- “अमिताभ यांच्या बंगल्याशेजारी असलेल्या सर्व मालमत्तांकडून जमीन ताब्यात घेण्यात आली आहे. हा एकच बंगला उरला आहे. ही बाब शहर सर्वेक्षण अधिकाऱ्यांकडे पाठवून, महापालिका केवळ वेळ वाया घालवित आहे. जर या रस्ता रुंदीकरणासाठी जमीन मिळाली नाही तर आम्ही या प्रकरणाची तक्रार लोकायुक्तांकडे करू. ”
मिरांडाच्या लेखी तक्रारीला उत्तर देताना के-वेस्ट वॉर्डने म्हटले आहे की बीएमसी त्या मालमत्तेतून लवकरात लवकर जमीन ताब्यात घेणार आहे. फक्त शहर सर्वेक्षण कार्यालयाने जमीन मोजणी करून प्रतीक्षा बंगल्यातील प्लॉटमधून किती जमीन घ्यायची आहे ते सांगावे. डिसेंबर २०१९ मध्ये प्रतीक्षाच्या सीमांकनासाठी अर्ज करून फी देखील भरली गेली आहे. फेब्रुवारी २०२१ मध्ये संयुक्त सीमांकन झाले. परंतु सर्वेक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले की, नकाशामध्ये काही त्रुटी आहेत.
अमिताभ बच्चन यांचा बंगला प्रतीक्षापासून रस्ता तयार करण्यासाठी बीएमसीला साधारणतः १० फुटाच्या आसपास जागेची आवश्यकता भासणार आहे. जी मालमत्तेची बाह्य भिंत तोडून सहजपणे प्राप्त केली जाऊ शकते. अमिताभ बच्चन यांच्याकडे एकूण पाच बंगले आहेत. ‘प्रतीक्षा’, ‘जनक’, ‘वत्स’, ‘जलसा’ आणि ‘अशियाना’. प्रतीक्षा ही अमिताभ बच्चन यांनी मुंबईत खरेदी केलेली पहिली संपत्ती आहे.
नंतर त्याचे आईवडील या बंगल्यात राहत होते. अभिषेक आणि श्वेताचा जन्मही या बंगल्यात झाला होता. यानंतर अमिताभ बच्चन कुटुंबीयांसह दुसरा बंगला ‘जलसा’ मध्ये शिफ्ट झाले. ‘जनक’ हे त्यांचे कार्यालय आणि वर्कप्लेस आहे, तर ‘वत्स’ सिटीबँकला भाडेतत्त्वावर दिला आहे. अमिताभ आपल्या परिवारासह सर्व सण साजरे करण्यासाठी अजूनही प्रतीक्षा बंगल्यावरच जातात.