अनेक दिवसांच्या लॉकडाऊननंतर, सरकारने चित्रपट आणि मालिकांच्या चित्रीकरणाकरिता परवानगी दिली खरी मात्र कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नाही. नियमांचे पालन करून चित्रीकरण करणे सर्वांनाच बंधनकारक आहे. झी युवा या वाहिनीने अतिशय योग्य रित्या हे सर्व नियम पाळूनच शूटिंग ला जून महिन्यात सुरुवात केली. मात्र या काळात कोरोनाच्या लॉकडाउनमुळे कोठारे व्हिजनच्या ‘प्रेम पॉयजन पंगा’ या झी युवावरील मालिकेतील दोन अतिशय महत्वाच्या पात्रांना या कोरोनाचा एक भलमोठा टैक्स द्यावा लागला आहे. या प्रतिभावान कलाकारांना कोरोनामुळे मालिकाच सोडावी लागली आहे. आपल्या सगळ्यांची लाडकी ‘प्रेम पॉयजन पंगा’ या मालिकेतील मालतीची भूमिका साकारणारी इरावती लागू आणि कैलास भोळे यांची भूमिका साकारणारे स्वप्नील राजशेखर, हे यापुढे या मालिकेत दिसणार नाहीत.
कोरोना टॅक्स किंवा कोरोनामुळे मालिका सोडावी लागली याचा नक्की अर्थ काय हा विचार प्रेक्षकांना पड़ला असेल पण काळजी करू नका आपले हे दोन्ही कलाकार अतिशय ठणठणित आणि निरोगी आहेत. त्यांना कोरोना झाला असे नाही तर केवळ आपल्या मालिकेतील लोकांना आपल्यामुळे त्रास होऊ नये या साठी अतिशय मोठ्या मनाने दोघांनीही हा निर्णय निर्माते महेश कोठारे आणि आदिनाथ कोठारे यांना कळवला. १३ जुलैपासून ‘झी युवा’ वाहिनीवरील मालिकांचे नवे भाग प्रदर्शित झाले त्यात प्रेक्षकांना हे दोन्ही कलाकार दिसले नाहीत. कारण हे दोन्ही कलाकार ज्या भागात राहतात, ते कोरोनाचे हॉटस्पॉट्स घोषित करण्यात आले होते. जेव्हा शूटिंग सुरु झाली तेव्हा, या भागातून बाहेर पडून, चित्रीकरणात सहभागी होणे योग्य नसल्याचे त्यांचे म्हणणे होते. त्यांच्या कुटुंबांच्या आणि अर्थातच मालिकेतील टीमच्या आरोग्याकरिता त्यांनी स्वताहूंन घेतलेला हा त्यांचा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. झी युवा वाहिनी आणि कलाकार यांच्या परस्पर सामंजस्यातून हा निर्णय घेतला गेला.
निर्माते महेश कोठारे यांना याबद्दल विचारले असता त्यांनी सांगितले, “आपले सहकलाकार यापुढे सेटवर नसणार याचे दुःख संपूर्ण टीमला झाले. अर्थात, हे दोघे जण साकारत असलेल्या भूमिका अत्यंत महत्त्वाच्या असल्यामुळे, या दोघांच्या अनुपस्थितीमुळे मालिकेच्या कथानकात अडथळा निर्माण होणारच होता. त्यामुळेच नाईलाजाने या भूमिका साकारण्यासाठी नव्या कलाकारांना आमंत्रित करण्यात आले. अभिनेत्री रसिका धामणकर आणि अभिनेता शेखर फडके हे यांना यापुढे या भूमिकांमध्ये प्रेक्षकांना दिसतील . सर्वांच्या हितासाठी, इतका मोठा निर्णय घेतलेल्या या कलाकारांविषयी कोठारे व्हिजन आणि झी युवा वाहिनीला नक्कीच अभिमान आहे.”
‘प्रेम पॉयजन पंगा’ या मालिकेतील या दोन नव्या कलाकारांना सुद्धा भरभरून प्रेम मिळेल याची वाहिनीला खात्री आहे. मालिका सोडण्याविषयी बोलताना अभिनेता स्वप्नील राजशेखर म्हणाले की, “२८ जूनला मी कोल्हापूरहुन मुंबईकडे रवाना होणार होतो. मात्र माझ्या इमारतीत ३ कोविड रुग्ण सापडल्यामुळे, इमारत सील करण्यात आली. पुढील १४ दिवस मला घरातच क्वारंटाईन होणं भाग होतं. किमान ३ जुलैपर्यंत मी चित्रीकरणासाठी पोचणे आवश्यक होते. हे शक्य नसल्यामुळे चित्रीकरणात अडचण निर्माण होणार होती. मी साकारत असलेली कैलास भोळे ही भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याने, कथानकात बदल करणे शक्य नव्हते. म्हणूनच सर्वांच्या हितासाठी मी मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थात माझा मित्र शेखर फडके ही भूमिका साकारणार आहे, याचा आनंद आहे. त्याला आणि मालिकेच्या पुढील वाटचालीला माझ्या मनपूर्वक शुभेच्छा!”