अभिनेत्री स्मिता तांबेच्या घरी सात दिवस गणेशोत्सव साजरा होतो. गणेशापाठोपाठच गौरींचेही आगमन होते. जेवढ्या मन लावून आपल्या प्रत्येक भूमिका स्मिता रंगवते, तेवढ्याच तन्मयतेने ती आपल्या लाडक्या बाप्पाचे आपल्या घरी आगत-स्वागत करते. स्मिताच्या घरी बाहेरून गणेशमुर्ती विकत आणली जात नाही, तर घरच्याघरी गणपतीची मुर्ती घडवून तिचा साजशृंगार करण्यापासून ते नैवेद्य आणि पूजा करण्यापर्यंत सर्व स्वत:च करण्यावर स्मिताचा भर असतो.
स्मिता तांबे आपल्या घरातल्या ह्या अनोख्या प्रथेविषयी सांगते, “मी आणि माझे यजमान आम्ही गणेशोत्सवाच्या अगोदर आठ दिवसांपासून तयारीला सुरूवात करतो. ते गणेशाची मुर्ती घडवतात. त्याला रंगवतात आणि मुर्तीला आभुषणे-वस्त्र हे सर्व मी करते. आम्ही शाडू मातीची मुर्ती घडवताना मुर्तीमध्ये बियाणं टाकतो. आम्ही मुर्ती घरीच कुंडीत विसर्जीत करतो. त्यामुळे विसर्जनानंतरही बाप्पाचा आशिर्वाद त्या नव्या उगवलेल्या रोपाच्या रूपात आमच्यासोबत कायमचा राहतो.”
स्मिता तांबे पूढे सांगते, “आमच्या जवळच्या मित्र-मैत्रिणींना जेव्हा आमची गणेशोत्सव साजरा करण्याची ही पध्दत समजली. तेव्हा त्यांनी आम्हांला त्यांच्या घरच्या गणेशोत्सवासाठी मुर्ती बनवण्याचा आग्रह धरला. त्यामुळे आता आम्ही आमच्या घरच्या गणपतीशिवाय गणेशोत्सवाच्या अगोदर जवळ-जवळ सात ते आठ गणेश मुर्ती बनवतो.”
स्मिता म्हणते, “गणेशोत्सवाच्या काळात मी नाटकाचे प्रयोग किंवा शुटिंग करत नाही. वर्षातून एकदा बाप्पा घरी येतो. तर त्याच्यासाठी घर स्वच्छ करण्यापासून, ते त्याचे कपडे बनवणे. त्याच्यासाठी नैवेद्याचे जेवण घरी बनवणे आणि गौराईचेही आगत-स्वागत करण्यापर्यंत सगळ्या गोष्टी मला स्वत:ला करायला आवडतात. हा सण आपल्याला खूप सकारात्मकता आणि उत्साह देऊन जातो, असं मला वाटतं. त्यामूळे भक्तिभावाने बाप्पाची आराधना करायला मला खूप आवडते.”