शिव ठाकरे ठरला कलर्स मराठीवरील “बिग बॉस मराठी सिझन 2” चा विजेता ! “रसिक प्रेक्षक माझे कुटुंब” – शिव ठाकरे

बिग बॉस मराठी सिझन 2 ची धमाकेदार सुरुवात तीन महिन्याआधी कलर्स मराठी वाहिनीवर झाली. बिग बॉस मराठीच्या घरातील स्पर्धकांनी कार्यक्रम सुरु होताच प्रेक्षकांची मने जिंकण्यास, त्यांच्या मनामध्ये एक विशेष स्थान मिळविण्यास सुरुवात केली. या घराने भांडण-वाद विवाद बघितले, मैत्री कशी निभवावी हे शिकवलं, सदस्यांचे रडण – हसण पाहिलं, सदस्यांच्या तक्रारी एकल्या, या घराने सदस्यांचा खरा चेहरा प्रेक्षकांसमोर आणला. बिग बॉस मराठी सिझन 2 देखील महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचलं आणि कानाकोपर्‍यात फक्त याच कार्यक्रमाची चर्चा सुरू झाली… बिग बॉस मराठीच्या या सिझनमध्ये सदस्य १०० दिवसं कॅमेरांच्या नजरकैदेत राहिली. आज १०० दिवसांचा हा रोमांचक प्रवास संपला… बिग बॉस मराठी सिझन 2 चा महाअंतिम सोहळा नुकताच मुंबईमध्ये पार पडला. स्पर्धक आणि प्रेक्षक सगळ्यांनाच उत्सुकता होती या पर्वाचा विजेता कोण असेल हे जाणून घेण्याची आणि शेवटी ज्याची वाट संपूर्ण महाराष्ट्र पहात होता तो क्षण आला. साहसी, जिगरबाज, लढवय्या अशा विशेषणांनी ज्याचे बिग बॉस यांनी कौतुक केले असा अमरावतीचा शिव ठाकरे बिग बॉस मराठी सिझन 2 चा विजेता ठरला आहे. तर नेहा शितोळेने पटकावले दुसरे स्थान. शिव ठाकरे याला सतरा लाख इतकी धनराशी आणि बिग बॉस मराठीची ट्रॉफी मिळाली.

बिग बॉस मराठीच्या घराने पहिल्या दिवसापासून सदस्यांची भांडण बघितली, नाती बनताना बघितली. जसे जसे दिवस पुढे गेले हीच नाती बदलली, त्यांच्यामध्ये कटुता आली… तरीदेखील हे घर प्रत्येक सदस्याच्या मागे खंबीरपणे उभे राहिले.
सदस्यांच्या या प्रवासात घरामध्ये ग्रुप पडले असले तरीदेखील हे ग्रुप फार काल टिकले नाही… बिग बॉस मराठीचे घर प्रत्येक सदस्याच्या मागे खंबीरपणे उभे राहिले. या घराने सुरेखाताईंची माया अनुभवली, अभिजीत केळकरच भाऊक होण पाहिलं, अभिजीत बिचुकलेसारखे हटके व्यक्तिमत्व या घरात आलं ज्याने अवघ्या महाराष्ट्राचे मन जिंकले, शिवानीची चीडचीड बघितली, वीणा आणि शिव यांची मैत्री पाहिली आणि १७ सदस्यांसोबत सुरू झालेला हा १०० दिवसांचा प्रवास कसा संपला हे कळलच नाही…

बिग बॉस मराठीच्या दुसर्‍या पर्वाबद्दल बोलताना व्यवसाय प्रमुख कलर्स मराठी निखिल साने म्हणाले, “बिग बॉस मराठीचे दुसरे पर्व जेंव्हा सुरू झाले तेंव्हा सगळ्यांच्या मनामध्ये या पर्वाबद्दल खूप उत्सुकता होती. कारण कार्यक्रमाच्या पहिल्या पर्वाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला होता… बिग बॉसच्या दुसर्‍या पर्वाला देखील संपूर्ण महाराष्ट्रामधून उदंड प्रतिसाद मिळाला. हे पर्व उतरोत्तर रंगत गेले, प्रत्येक पर्वामध्ये वेगेवगेळे सदस्य येणार, जे वेगवेगळया स्वभावांचे असणार… बिग बॉसच यश यातच आहे अस मला वाटत की, तुम्हाला प्रत्येक पर्वामध्ये त्याचा एक वेगळा रंग बघायला मिळतो. आणि दुसर्‍या पर्वाचे यश यातच आहे की, इतक्या वेगवेगळ्या स्वभावाची लोक प्रेक्षकांना बघायला मिळाली. अशा कार्यक्रमाची हीच एक गमंत आहे वेगवेगळे टॅलेंट बघायला मिळतात, आणि तसच काहीस इथं झालं शिव अत्यंत वेगळ्या
क्षेत्रातुन आला आहे आणि तो जिंकला. घरातील प्रत्येकच सदस्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत अस मला वाटत”.

शिवने बिग बॉस मराठीच्या घरामध्ये पहिला कॅप्टन होण्याचा मान पटकावला. शिव ठाकरेला बिग बॉसमुळे नवी ओळख मिळाली. शिवने घरातील सगळ्यांचे मन त्याच्या स्वभावामुळे जिंकले… या क्षणी बोलताना शिव ठाकरे म्हणाला, “या क्षणाचे स्वप्न मी बर्‍याच वर्षांपासून पाहिले होते, आणि ते आज सत्यात उतरले याचा मला खूप आनंद होतो आहे… मी तुमच्या सगळ्यांचाच भाग आहे.. माझी सगळी स्वप्न साकार होत आहेत … मला मिळालेली धनराशी मी आईच्या हाती सुपूर्त करणार आहे… मी बिग बॉसच्या घरामध्ये जाण्याआधी कुठलीही तयारी केली नव्हती, मला फक्त घरात जायचे होते, मी
तिथे प्रत्येक क्षण जगलो… रसिक प्रेक्षक माझ्यासाठी माझे माझे कुटुंब आहेत आणि त्यांच्या पाठिंब्यामुळे मी जिंकू शकलो इतकेच सांगेन”.

बिग बॉस मराठीच्या दुसर्‍या पर्वाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. बिग बॉस मराठी या कार्यक्रमाचा प्रवास संपला असून पुढील आठवड्यामध्ये प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या स्पर्धकांचा प्रवास बघण्याची संधी मिळणार आहे. तेंव्हा बघायला विसरू नका बिग बॉस मराठी फक्त कलर्स मराठीवर.