कॅफेमराठीची धमाकेदार वेब सिरीज डॉटेड की फ्लेवर्ड समाजप्रबोधनासाठी हाताळला हटके फंडा
कोणताही जॉब हा वाईट नसतो, जॉब हा जॉब असतो …असा आशय असणारी कॅफेमराठीची पहिली मराठी वेब सिरीज सध्यातरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाली आहे. सध्या सगळीकडेच डिजिटलची जोरदार क्रेझ आहे. विशेष करून तरुण वर्गाचा अधिकतर वेळ हा स्मार्ट फोन आणि डिजिटलवर जातो. डिजिटलमध्ये मनोरंजन हा देखील आता महत्वपूर्ण घटक झाला आहे. महाराष्ट्रात इंटरनेटची वापरणाऱ्यांची संख्या देखील झपाटयाने वाढते आहे.
परंतु मराठी तरुण इंटरनेट युजर्सना डिजिटलमध्ये हवा तसा आशय मिळत नव्हता. आता हीच उणीव कॅफेमराठी या युट्यूब चॅनलने भरून काढली आहे. अल्पावधीत कॅफेमराठी युट्यूब चॅनलची प्रेक्षक संख्या एक कोटी ऐंशी लाखाहून अधिक झाली आहे. सामाजिक संदेश तोही आजच्या तरुणांच्या स्टाईलने देत कॅफेमराठीने डॉटेड की फ्लेवर्ड ही नवीन धमाकेदार अशी मराठी वेब सिरीज युट्यूबवर प्रदर्शित केली आहे. पाच एपिसोडमध्ये असणाऱ्या या सिरीजचे दिग्दर्शन संदीप मनोहर नवरे यांनी केले आहे.
मराठीत पहिल्यांदाच एका वेब सिरीजचा विशेष खेळ सिनेमागृहात आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी पत्रकार आणि मराठी अभिनेते सिद्धार्थ जाधव, तृप्ती जाधव, दिग्दर्शक राजू मेश्राम इ. उपस्थित होते. बिंदास बोल फेम भक्ती पठारे हिच्या धम्माल सूत्र संचालनाने अनेकांची मनं जिंकून घेतली. या प्रसंगी सिद्धार्ध जाधव म्हणाले कि, मला खरोखर आनंद होतो आहे कि, कॅफेमराठीने त्यांच्या पहिल्याच वेब सिरीजचा इतक्या जल्लोषात विशेष खेळ आयोजित केला. कॅफेमराठीचे संस्थापक निखील रायबोले, भुपेंद्रकुमार नंदन आणि दिग्दर्शक संदीप नवरे यांचे मी प्रथम अभिनंदन करतो. महत्वाचं म्हणजे इतका धाडसी विषय त्यांनी इतक्या सहजपणे सिरीजच्या माध्यमातून मांडला ही खूप विशेष बाब आहे. कलाकार विभव राजाध्यक्ष, अनिता महाजन, अशोक साळवी, नेहा परांजपे, सीमा कुलकर्णी, रोहित माने, दिपेश ठाकरे, अरुण नलावडे, सौरभ अरोटे, नम्रता प्रधान आणि भुपेंद्रकुमार नंदन या सर्वांच्या कामाचे कौतुक करायला देखील ते विसरले नाहीत.दिग्दर्शक राजू मेश्राम म्हणाले कि, कॅफेमराठीला नेमकं समजलंय कि मराठी तरुण वर्गाला काय हवं आहे, पण ते देत असतांना सामाजिक भान जपत त्यांनी या विषयाची हाताळणी केली आहे हे कौतुकास्पद आहे. सिरीजचे दिग्दर्शक संदीप नवरे सांगतात की, तरुणांच्या मनात नेमकं काय चाललं हे समजणे फार कठीण असते, मग त्यांना काय बघायला आवडेल हे तर त्याहून कठीण. मग आम्ही तरुणांच्या जवळचा विषय म्हणजे..जॉब या भोवती एक कथानक गुंफले. डॉटेड की फ्लेवर्ड या शिर्षकाखाली त्याचे पाच भाग कॅफेमराठीच्या युट्यूब चॅनलवर प्रदर्शित करण्यात येतील. एका सामान्य तरुणाची ही गोष्ट आहे जि बघतांना तुम्हाला रोजच्या आयुष्यातील घटना आणि प्रसंग नक्कीच आठवतील. कोणताही जॉब वाईट नसतो, जॉब हा जॉब असतो असा संदेश आम्ही यातून देत एक वेगळ्या मार्गाने समाजप्रबोधन देखील करत आहोत, परंतु तरुणांना ज्याप्रकारचे आशय बघायला आवडतात त्याप्रकारात आम्ही त्याचे सादरीकरण केल्याने आमचा हेतू सफल झाल्याचे आम्हाला वाटते.