Jai Malhar Fame Devdatta Nage’s ‘Chembur Naaka’ Marathi Movie

1711

Devdatta Nage Upcoming Marathi Movie ‘Chembur Naaka’ 

काही कलाकार केलेल्या कामांमुळे ओळखले जातात. त्यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखांचा ठसा रसिकांच्या मनावर असा काही उमटतो की, प्रेक्षक त्यांना पुनःपुन्हा नवनवीन भूमिकांमध्ये पाहण्यासाठी आतुरतात. झी मराठी वाहिनीवरील ‘जय मल्हार’ या मालिकेत खंडेरायांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता देवदत्त नागे यांनी प्रेक्षकांवर अशी काही जादू केली की,अवघ्या महाराष्ट्रातीलच नव्हे तर परदेशात वसलेला मराठमोळी प्रेक्षकही त्यांच्या अभिनयावर फिदा झाला. हेच देवदत्त नागे सध्या काय करत आहेत? हा प्रश्न अनेकांना सतावत होता. या प्रश्नाचं उत्तर मिळालं असून लवकरच ते एका नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

साक्षी व्हिजन प्रॉडक्शनच्या बॅनरखाली बनणाऱ्या डॉ. सीमा नितनवरे आणि देवदत्त नागे यांची निर्मिती असलेल्या ‘चेंबूर नाका’ या आगामी मराठी चित्रपटात देवदत्त एका नव्या रूपात मराठी रसिकांना दिसणार असून नितेश पवार या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. ‘चेंबूर नाका’ या चित्रपटाच्या पोस्टरचे उद्घाटन नुकतेच जे.के. बेक्वेट्स, प्रभादेवी येथे केंद्रिय सामाजिक व न्याय मंत्री मा. खा. श्री. रामदासजी आठवले, गोस्वामी श्री नीरजकुमारजी महाराज, सुवर्णाताई डंबाळे आणि उपस्थित पत्रकारांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी चित्रपटातील कलाकार आणि तंत्रज्ञ मंडळी तसेच मराठी व हिंदी चित्रपट सृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित होती.

मराठी मालिका विश्वातील मैलाचा दगड ठरावा अशी ‘जय मल्हार’ ही मालिका केल्यानंतर देवदत्त नेमक्या कोणत्या रूपात समोर येणार हे कोडं त्यांच्या चाहत्यांना पडलं होतं. याच कारणामुळे देवदत्त यांनीही अगदी निवडक चित्रपटांना प्राधान्य देत ‘Chembur Naaka’ ‘चेंबूर नाका’ हा एका आगळया वेगळया विषयावरील चित्रपट निवडला आहे. या चित्रपटात देवदत्त यांनी दत्ता नांगरे नावाची व्यक्तिरेखा साकारली आहे.‘जय मल्हार’ नंतर पुढे काय हा प्रश्न इतरांप्रमाणे देवदत्त यांच्या समोरही होता, पण येणारा प्रत्येक सिनेमा न स्वीकारता राजहंसाप्रमाणे चोखंदळ राहत त्यांनी आशयघन चित्रपटांचा स्विकार करीत दिग्दर्शक नितेश पवार यांच्या ‘चेंबूर नाका’ची निवड केली. या चित्रपटाच्या विषयासोबतच त्यातील धडाकेबाज व्यक्तिरेखा भावल्याचं देवदत्त मानतात.

आजच्या काळातील प्रेक्षकांना प्रवाहापेक्षा काहीतरी वेगळ, पण वास्तवतेचं भान राखणारं हवं असल्याचं देवदत्त यांचं मत आहे. ‘चेंबूर नाका’ हा चित्रपट याच वाटेने जाणारा असल्याने त्याला नकार देण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता असंही देवदत्त म्हणतात. एक्शन आणि इमोशनने भरपूर अशा या चित्रपटातील सहकलाकारांची टिमही आपापल्या व्यक्तिरेखांना न्याय देण्यासाठी सक्षम असल्याने काम करताना समाधान लाभत असल्याचं देवदत्त यांचं म्हणणं आहे.

समाजकार्यात नेहमीच आघाडीवर असलेल्या डॉ. सीमा नितनवरे यांनी यापूर्वा ‘उम्मीद’,‘मुक्ती’ यांसारख्या जवळजवळ 12 शॉर्टफिल्म्स बनविल्या आहेत. ‘चेंबूर नाका’च्या निर्मितीबरोबरच त्या इतर दोन चित्रपटांच्या निर्मितीमध्ये व्यस्त असून यापुढेही उत्तम विषयांवर चित्रपट निर्मिती करण्याचा त्यांचा मानस आहे. दिग्दर्शक नितेश पवार यांनी ‘सोपान’ या चित्रपटाद्वारे रसिकांच्या मनावर आपल्या कामगिरीचा अमीट ठसा उमटवण्यात यश मिळवलं आहे. पदार्पणातील चित्रपटामध्ये अपार यश मिळवल्यानंतर ‘चेंबूर नाका’ या चित्रपटात नितेश पुन्हा एकदा एक आव्हानात्मक विषय हाताळत आहेत.

या चित्रपटाची कथा नितेश यांनी समध खान यांच्या साथीने लिहिली आहे. याशिवाय बिपीन धायगुडे यांच्यासोबत त्यांनी ‘चेंबूर नाका’ची पटकथा आणि संवाद लिहिले आहेत. गुरू ठाकूर यांच्या लेखनीतून साकारलेल्या गीतांना संगीतकार अमितराज संगीतबद्ध करणार आहेत. देवदत्तसोबत या चित्रपटात उषा नाडकर्णा, विद्याधर जोशी, मिलिंद शिंदे, धनंजय पोलादे इ. कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. संकेत शहा या चित्रपटाचे कॅमेरामन आहेत. या चित्रपटातील व्यक्तिरेखांच्या वेशभूषेची जबाबदारी सिद्धिका सावंत यांच्याकडे असून रंगभूषा संतोष गिलबिले करीत आहेत. देवेंद्र तावडे कलादिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळीत असून राजू झेंडे या चित्रपटाचे प्रॉडक्शन मेनेजर आहेत.