मराठी अभिनेत्री केतकी माटेगावकरचे नाव अवघ्या महाराष्ट्राला चांगलेच परिचयाचे आहे. ‘शाळा‘ सिनेमातून करिअरला सुरुवात करणा-या केतकीने कमी वयातच कतृत्वाचा ठसा उमटवला. अभिनयासोबत गायनाचा सुरेल वारसा लाभलेल्या केतकीने मराठीसोबतच हिंदी भाषेतील गाण्यांनाही आवाज दिला आहे. अभिनय आणि गायन अशी दोनही कामगिरी यशस्वीपणे पार पाडणा-या केतकीचा पहिला सोलो अल्बम प्रकाशित झाला आहे.
‘युनिव्हर्सल म्युझिक इंडिया‘ निर्मित या अल्बमचे नाव ‘केतकी‘ असेच आहे. व्हिले पार्ले येथील नवीन भाई ठक्कर सभागृहात संपन्न झालेल्या या सोहळ्यात गायक-संगीतकार शंकर महादेवन, जेष्ठ संगीतकार अशोक पत्की यांच्या उपस्थित ‘केतकी’चे प्रकाशन करण्यात आले. या प्रसंगी प्रथमेश परब, गायिका सुवर्णा आणि पराग माटेगावकर, ऋषीकेश रानडे, संगीतकार मिलिंद जोशी, प्रविण कुवर, मेघना जाधव, अभिनेत्री पूर्वा पवार, गीतकार नचिकेत जोग, केदार परांजपे यांच्यासह मराठी सिनेसृष्टीतील तसेच संहीत क्षेत्रातील मान्यवरांची या सोहळ्यात उपस्थिती दर्शवली.
केतकीमध्ये एकूण नऊ गाणे आहेत. ‘माझ्या मना…’, ‘भास हा…’, ‘चंद्र माझ्या ओंजळीत…’, ‘काळ लोटला…’, ‘मनमोहना…’, ‘नादावल पाखरु…’, ‘पुन्हा एकदा…’, ‘पाऊस होऊन ये…‘ या गीतांचा सामावेश आहे. गीतकार नचिकेत जोग, श्रुती विश्वकर्मा आणि वैभव जोशी यांची लिहिलेल्या या गाण्यांना संगीतकार केदार पंडित यांनी संगीत दिले आहे.