नवनव्या संकल्पना असणाऱ्या दर्जेदार मालिका प्रेक्षकांसाठी घेऊन येणारी मराठी वाहिनी ‘झी युवा’, प्रेक्षकांची सर्वाधिक लाडकी वाहिनी आहे. उत्तमोत्तम मालिकांच्या बरोबरीनेच अनेक उत्कृष्ट कार्यक्रम सुद्धा ‘झी युवा’च्या माध्यमातून पाहायला मिळतात. तरुणांच्या दैदिप्यमान कामगिरीचा सन्मान करण्यासाठी, गेली तीन वर्षे ‘झी युवा सन्मान’ हा सोहळा आयोजित करण्यात येत आहे. विविध क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या युवा पिढीतील आदर्श व्यक्तींचा सन्मान या सोहळयात केला जातो. काही विशेष पुरस्कार या सोहळ्यात प्रदान करण्यात येतात. यंदाही हा सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला.
‘स्त्री’चं कर्तृत्त्व, स्त्रीची जिद्द नेमकी काय असते, याचं एक मोठं उदाहरण म्हणजे ‘कनिका कौस्तुभ राणे’!! कनिका या, जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात मागील वर्षी शहीद झालेले मेजर कौस्तुभ राणे, यांच्या पत्नी आहेत. पतीच्या निधनामुळे त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. ३ वर्षांच्या लहानग्याची व संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर आली.
परंतु, या परिस्थितीतने खचून न जाता, त्यांनीही भारतीय लष्करात भरती होण्याचा निर्णय घेतला. अवघ्या काही कालावधीतच, लष्कराच्या परीक्षा पास होऊन त्यांनी आपण प्रशिक्षणासाठी तयार असल्याचं दाखवून दिलं. मोठ्या दिमाखात भारतीय लष्कराचा एक भाग होऊन, त्यांनी कठीण परिस्थितीतून बाहेर पडत, केवळ कुटुंबाचीच नाही, तर संपूर्ण देशाच्या सुरक्षेची जबाबदारी या रणरागिणीने आपल्या खांद्यावर घेतली. अशा या जिद्दी स्त्रीला, ‘युवा जिद्दीची यशोगाथा’ हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.
या पुरस्काराच्या बरोबरीने, इतरही अनेक पुरस्कार देण्यात आले. सामाजिक, व्यावसायिक क्षेत्रातील पुरस्कार सुद्धा या सोहळ्यात प्रदान करण्यात आले आहेत. सारंग गोसावी यांना ‘सामाजिक जाणीव सन्मान’, अक्षय बोरकर यांना ‘उद्योजक सन्मान’, सारंग नेरकर यांना ‘संशोधक सन्मान’ या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. याशिवाय ‘कला सन्मान’चा मान अभिनेता आदिनाथ कोठारे याला, ‘संगीत सन्मान’चा मान गुणी गायक जसराज जोशी याला, ‘डिजिटल कला सन्मान’ हा पुरस्कार सारंग साठ्ये याला मिळाला. ‘युवा साहित्य सन्मान’ पुरस्काराचा मान मनस्विनी लता रवींद्र हिला मिळाला तर, डॉ. आरती बंग यांना ‘युवा संजीवनी सन्मान’ व ‘एनडीआरएफ’ला ‘युवा अलौकिक योगदान सन्मान’ या पुरस्काराने गौरवण्यात आले. महाराष्ट्रातील गुणवान युवांचा हा भव्यदिव्य सन्मानसोहळा पाहायला विसरू नका, ‘झी युवा’ वाहिनीवर, रविवार १३ ऑक्टोबर रोजी, दुपारी १२ आणि संध्याकाळी ७ वाजता!!!