चहा विकणारा भारताचा पंतप्रधान झाला. भारतात मोदींची मोठी लाट आली आणि भारताच्या राजकारणाला वेगळ वळण मिळालं. मोदींच्या लाटेसोबतच महाराष्ट्रात चहाचीसुद्धा लाट आली. आणि विशेष चवींचा चहा, सर्वत्र मिळू लागला.
असाच एक रॉयल माणसांचा रॉयल चहा म्हणजेच ‘गजाभाऊचा बुलेट चहा’. ह्या बुलेट चहाच्या रॉयल चवीची जन्मकथा फार रंजक आणि प्रेरणादायी देखील आहे. आडनावं, नावं वापरून ब्रॅण्ड तयार झालेल्यांमध्ये, ह्या चहाचं हटके नावच सगळ्यांना खेचू लागलं. नावातच बुलेट असल्यामुळे हा रॉयल चवीचा चहा, अल्पावधीच महाराष्ट्राच्या जिभेवर रेंगाळू लागला.

कोण आहे हा गज्या? बुलेटचं आणि त्याचं नातं काय? तर गजाभाऊ म्हणजे पुण्यात राहणारा तरुण गजानन सरकाळे. गजाननला वडिलोपार्जित व्यवसायावर लक्ष्य देण्यात अजिबात रस नव्हता. कॉलेज पूर्ण झाल्यावर, घरच्यांकडून आवडती बाईक बुलेट मिळाली. मग बुलेटवर लांबच्या ट्रीपा, ट्रेकिंगची हौस असल्यामुळे, गजाभाऊ बुलेटवर लडाख, कन्याकुमारीपर्यंत जावून आला. सुपरीचंसुद्धा व्यसन नसणाऱ्या गजाभाऊला, व्यसन होतं फक्त चहाचं. जिथ जिथ जायचा त्या ठिकाणचा चहा प्यायचा. थोडक्यात, बारा गावचा चहा पिलेला.

काही वर्षांनंतर घरच्यांकडून एक रुपयाही न घेता, स्वतःच्या पायावर उभ राहायला पाहिजे अस गजाभाऊला वाटू लागलं. साठवलेल्या पैशांची तडजोड करून सायबर कॅफे उभारला पण म्हणवं तितकं त्या व्यवसायात यश काही मिळालं नाही. चुकांची जाणीव होताच, अभ्यासपूर्व पुढील व्यवसायाचं नियोजन केलं.  व्यवसायचं नियोजन करतेवेळी भेटला श्रीक्या म्हणजे श्रीकांत भोसले. स्वतः इंटेरिअर डिझाईनर असलेल्या श्रीकांतने ह्याआधी बरेच छोटे मोठे व्यवसाय केले होते. मात्र समाधानकारक यश मिळालं नव्हतं. कुठेही जॉब करायचा नाही म्हणून डोक्यात सतत व्यवसायाची गणित असणारा असा हा खटपट्या तरुण, श्रीकांतला व्यवसाय कसा, कधी, कुठे करायचा, ह्याची सूत्र बऱ्यापैकी माहित होती. गजाभाऊला व्यवसाय कोणता करावा हा प्रश्न आणि श्रीकांतला, व्यवसायात कोण सोबत असेल हा प्रश्न.

दोघांच्या भेटीने दोघांच्याही प्रश्नाची उत्तर सापडली. कोल्ड, हॉट कॉफीच्या वाढत्या मागणीत, महाराष्ट्राची संस्कृती दाखवणारा चहा, जपण्याचा निर्णय घेतला. नामवंत, सुप्रसिद्ध अशी चहाची शाखा चालवायला घायचं ठरवलं. पैशांची जुळवाजुळव केली. मित्रांनी थोडीफार आर्थिक मदतही केली. सुरवातीच्या काळात चहाच्या व्यवसायात काही नफा झाला नाही. पण तरीही प्रामाणिकपणे काम करण सोडलं नाही. प्रामाणिक काम करण्याचं फळ काय मिळालं तर, चहाच्या शाखेकडून फसवणूक करण्यात आली. ह्यात नामवंत शाखेवरचा विश्वास तर उडालाच पण आर्थिक नुकसानही झाले.
खचलेल्या मनस्थितीत दोघांचा एक निर्णय मात्र ठाम होता. तो म्हणजे, आता आपणही चहाचंच हॉटेल टाकायचं. चहा उद्योगात येणाऱ्या मराठी उद्योजकांना आर्थिक फायदा व्हावा, त्यांना आत्मविश्वास मिळावा या उद्देशाने चहाच्या शाखा उपलब्ध करून देण्याचं ठरवल. बिबवेवाडी येथे चहाचं हॉटेल चालू केलं. हॉटेलला नाव देण्यात आलं ‘गजाभाऊचा बुलेट चहा’. ‘रॉयल माणसांचा, रॉयल चहा’.

उद्योगात पाऊल ठेवणारा मराठी माणूस रॉयलचं आहे असा आत्मविश्वास देणारा. चहा पिणाराही रॉयलचं आहे याची जाणीव करून देणारा चहा अस गजाभाऊ आणि श्रीकांतच म्हणनं आहे. बघता बघता बुलेट चहा सुपरिचित होवून ब्रॅण्डदेखील झाला.  नावाला आकर्षित होवून बुलेटवर फिरणारा बराच वर्ग चहा प्यायला येऊ लागला. गजाभाऊचा चहा लोक ट्रेकिंगला तर घेवून चालेलच पण, मोठ्या राजकीय नेत्यांनी थर्मास पाठवून, विमानाच्या प्रवासात सुद्धा नेला. चहा पिल्यानंतर ग्राहक चवीची स्तुती केल्याशिवाय राहत नाहीत.  पुण्यात बऱ्याच ठिकाणी बुलेट चहाच्या शाखा सुरु झाल्या. काही महिन्यात महाराष्ट्रातचं नव्हे तर संपूर्ण देशभरात गजाभाऊच्या बुलेट चहाची धकधक ऐकू येणार यात काही शंकाच नाही…