मेडिकल कॉलेजची डीन, मोनिका श्रीखंडे ही अतिशय कडक शिस्तीची आणि कठोर आहे. याउलट तिची आई, म्हणजेच रोहिणी हट्टंगडी यांनी साकारलेली आजी ‘सुपरकूल’ आणि प्रेमळ आहे. परस्पर विरोधी स्वभावाची ही दोन पात्रं त्या साकारत आहेत; परंतु त्यांच्यातील ऑनस्क्रीन केमिस्ट्री जबरदस्त आहे. दोघींच्या चाहत्यांसाठी ही फार मोठी पर्वणी आहे. रोहिणी हट्टंगडी यांच्यासोबत पुन्हा काम करत असल्याचा अनुभव शेअर करताना श्वेता म्हणाली;“‘डॉक्टर डॉन’ या मालिकेत रोहिणीजींच्या मुलीची भूमिका मी साकारत आहे. रोहिणी हट्टंगडीजींसोबत पुन्हा काम करण्याची संधी मिळाली याचा मला खूप आनंद झाला आहे. आम्ही याआधी एका मालिकेत काम केले आहे, मात्र त्यावेळी फारवेळा स्क्रीन शेअर केलेली नाही. ‘डॉक्टर डॉन’ या मालिकेच्या माध्यमातून मला ती संधी सुद्धा मिळाली आहे. ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन सुद्धा त्या तेवढ्याच कूल आहेत.
मोठ्या आणि छोट्या पडद्याच्या माध्यमातून आजवर अनेक डॉन आपण पाहिलेले आहेत. सध्या ‘झी युवा’ वाहिनीवर असाच एक इंटरनॅशनल डॉन पाहायला मिळत आहे. ‘डॉक्टर डॉन’ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची पहिली पसंती मिळवली आहे. एक डॉन, त्याचे काळे धंदे, त्याचं वैयक्तिक आयुष्य, आणि या सगळ्या गोष्टींमध्ये त्याची उडणारी तारांबळ, या गोष्टी ‘डॉक्टर डॉन’ या मालिकेतून विनोदी पद्धतीने दाखवण्यात येत आहेत. या मालिकेची आणखी एक खासियत म्हणजे दिग्गज कलाकारांचे छोट्या पडद्यावर होत असलेले पुनरागमन!!! अभिनेता देवदत्त नागेसह सुप्रसिद्ध अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी आणि ‘हॉट अँड बोल्ड’ श्वेता शिंदे सुद्धा या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहेत. रोहिणी हट्टंगडी आणि श्वेता शिंदे मोठ्या कालावधीनंतर एकत्र काम करत आहेत. याआधी दोघींनीही ७ वर्षे एकत्र काम केलेलं आहे. त्यामुळे त्यांची यशस्वी केमिस्ट्री ‘डॉक्टर डॉन’मधून सुद्धा पाहायला मिळत आहे. अर्थात त्यावेळी खलनायिकेच्या भूमिकेत असलेली श्वेता, यावेळी रोहिणी हट्टंगडी यांच्या मुलीची भूमिका साकारत आहे.