‘झी युवा’वरील ‘ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण’ या मालिकेत आनंद इंगळे सदानंद झगडे नावाच्या वकिलाची व्यक्तिरेखा रेखाटत आहेत.ऑस्ट्रेलियाहून आलेल्या नचिकेत देशपांडे नावाच्या शेजा-याला त्रास देण्यासाठी स्वभाषा आणि स्वदेशीचा आग्रह धरणारे अप्पा केतकर या झगडे वकिलांना घेऊन येतात. पण सदानंद झगडे अप्पांची बाजू घेणार, की नचिकेतची, ही धमाल आपल्याला 3 ऑक्टोबरपासून रात्री 8 वाजता ऑलमोस्ट सुफळ संपूर्णमध्ये बघता येईल.

स्वतः मराठी भाषेबाबत अतिशय आग्रही असलेल्या आनंद इंगळे यांना या मालिकेच्या विषयामुळे ही छोटीशी, पण महत्त्वाची भूमिका करताना वेगळीच मजा आली. ही मालिका जितकी धमाल आहे, तितकीच धमाल संपूर्ण युनिटसोबत शूटिंग करताना आली, असं आनंद इंगळे यांनी सांगितलं.“सई आणि नचिकेत यांची प्रेमकहाणी सुफळ संपूर्ण व्हावी, असं सगळ्या प्रेक्षकांप्रमाणेच मलाही वाटतं. या प्रेमकहाणीत अप्पा कसे आणि कोणते अडथळे आणणार आणि त्या अडथळ्यांवर नचिकेत कशी मात करणार, हे नक्की बघा”, असं आवाहन आनंद इंगळे यांनी प्रेक्षकांना केलं आहे..