अनेक तरुणींचा लाडका, हॅन्डसम अभिनेता ललित प्रभाकर, ‘आनंदी गोपाळ’ या चित्रपटात गोपाळरावांच्या काहीशा निराळ्या भूमिकेत पाहायला मिळाला. नेहमी कूल आणि चार्मिंग लूक्समध्ये दिसणारा हा गुणी अभिनेता, गोपाळरावांच्या भूमिकेसाठीही साजेसा वाटला. येत्या रविवारी, २२ तारखेला ‘झी टॉकीज’ वर ‘आनंदी गोपाळ’चा ‘टेलिव्हिजन प्रीमियर’ होणार आहे. त्यानिमित्ताने त्याच्याशी गप्पा मारताना; ‘तरुणपणी चरित्रपट करायची संधी मिळणं हे मोठं भाग्य आहे’, असं सांगतोय ललित प्रभाकर;

१. ‘आनंदी गोपाळ’ या चरित्रपटात काम करण्याचा तुझा अनुभव कसा होता?
आतापर्यंत केलेल्या सगळ्या कामांपेक्षा हा एक वेगळा अनुभव होता. चरित्रपटाचं कथानक, पटकथा या सगळ्याच गोष्टी निराळ्या असतात. एवढ्या तरुण वयात चरित्रपटात काम करायची संधी मला मिळाली याचा मला आनंद आहे. एक वेगळ्या प्रकाराची भूमिका करायला मिळाली. त्यामुळे सुद्धा खूप आनंद झाला.

२. या भूमिकेसाठी कशाप्रकारे तयारी करावी लागली? काही आव्हाने समोर होती का?
या भूमिकेत माझ्या वयात होत असलेला बदल, हा साधारण तीस ते चाळीस या वयाचा होता. त्यामुळे, त्यासाठी शरीरात, चेहऱ्यात व आवाजात होणारा बदल दाखवणं, ही गोष्ट फार आव्हानात्मक होती. त्या काळातील भाषा, हावभाव व त्या काळात एखादी व्यक्ती कशाप्रकारे वागत असेल, हे समजून घेऊन त्यानुसार काम करणं सुद्धा कठीण होतं.

३. या चित्रपटासाठी तुझ्या ‘लुक’वर तुला मेहनत घ्यावी लागली. याविषयी आम्हाला काय सांगशील?
मी आधी म्हणालो त्याप्रमाणे, लुकवर मेहनत घेणं हेच खूप कठीण काम होतं. वयाचा दहा वर्षांचा प्रवास यात दाखवायचा होता. साधारण दोन वर्षांच्या अंतराने चेहऱ्यात झालेले बदल पडद्यावर दिसणार होते. फार मोठा बदल असेल, तर मेकअपच्या साहाय्याने तो दाखवता येतो. पण, हे सूक्ष्म बदल नीट दाखवणं हे फार मोठं आव्हान होतं. त्यामुळे त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली.

४. सहकलाकार भाग्यश्री शंकपाळ सोबत काम करण्याचा अनुभव कसा होता?
भाग्यश्री नाटकाची पार्श्वभूमी असलेली अभिनेत्री आहे. संपूर्ण कलाकृती घडत असताना एकमेकांचं काम समजून घेणं अशा कलाकारांना सोपं जातं. शिवाय चित्रीकरण सुरु होण्याआधी आमचं एक वर्कशॉप घेतलं होतं. आम्ही दोघे कसं काम करतोय हे समजून घेणं त्यावेळी सोपं झालं. चित्रीकरणाच्या वेळी ही मेहनत नक्की किती आहे, हे फारसं दिसून येत नाही. पण, चित्रपट बघत असतांना आम्ही घेतलेली मेहनत फळाला आल्याचं जाणवत आहे. ज्यांनी चित्रपट पाहिला आहे, त्यांनाही हे कळलं असेल. ज्यांनी चित्रपट पाहिलेला नाही, त्यांच्यासाठी ‘झी टॉकीज’ येत्या रविवारी ‘टेलिव्हिजन प्रीमियर’ घेऊन येत आहे.

५. चित्रीकरणादरम्यानची एखादी आठवण आम्हाला सांगशील का?
गोपाळरावांच्या भूमिकेसाठी टक्कल करून घ्यावं लागणार होतं. हे काम पहिल्या दिवशी सेटवरच झालं. पण, टक्कल करून घेतल्यावर मी माझ्या हॉटेल रूममध्ये परत गेलो. मला काहीवेळ तरी कुणाशीही बोलायचं नव्हतं. जितक्या सहजपणे मी टक्कल करून घेतलं, तितकं ते सोपं नसल्याचं जाणवत होतं. ही एक आठवण कायमची स्मरणात राहील.
भाग्यश्रीसोबत माझा चित्रपटातील पहिला प्रसंग चित्रित करताना पण एक किस्सा घडला. हा एक महत्त्वाचा सीन होता. अर्धं चित्रीकरण झाल्यावर पावसामुळे सेट खराब झाला. त्यामुळे तो प्रसंग अर्ध्यावरच ठेवावा लागला. दोन दिवसांनंतर पुन्हा, एक अर्धवट राहिलेला सीन पूर्ण करताना धाकधूक होती. पण, तो योग्यप्रकारे पार पडला.