‘H2O कहाणी थेंबाची’ मधील सिया म्हणजेच शीतल अहिरराव आता एका विनोदी चित्रपटात झळकणार आहे. ‘वॉक तुरु तुरु’, ल’ई भारी पोरी’, ‘इश्काचा किडा’ यांसारख्या धमाल म्युझिक अल्बम्समधून आपल्या भेटीस आलेली शीतल आता विनोदवीर भाऊ कदम यांसोबत अभिनयाची जुगलबंदी करणार आहे म्हटलं तर.. शीतल आणि भाऊ ‘व्हीआयपी गाढव’ या आगामी चित्रपटात नवरा-बायकोच्या भूमिकेत दिसतील. भाऊ कदमसारख्या मातब्बर कलाकारासमवेत काम करताना शीतलचा ही कस लागला असावा यात काही शंका नाही.

नेहमी हलक्या भूमिकांत दिसणारी शीतल पहिल्यांदाच एका गावरान बाईच्या भूमिकेत प्रेक्षकांना हसवणार आहे. संजय पाटील दिग्दर्शित ‘व्हीआयपी गाढव’ १३ सप्टेंबर संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. ‘जलसा’, ‘मोल, ‘फक्त एकदाच’, ‘होरा’, ‘सलमान सोसायटी’ यांसारख्या चित्रपटांतून नावारूपास आलेल्या शीतलने अलीकडेच ‘H2O कहाणी थेंबाची’ या पाण्यासारख्या गंभीर विषयावर भाष्य करणाऱ्या सामाजिक चित्रपटात सियाची मध्यवर्ती भूमिका साकारली होती. तिच्या या भूमिकेचे सर्व स्तरांतून कौतुक झाले असून मराठी मनोरंजनक्षेत्रातल्या या नव्या उभरत्या ताऱ्याला प्रेक्षकांचीही पसंतीची पावती लाभली आहे.

सातत्याने नवनवीन जॉनरचे चित्रपट स्विकारणारी शीतलची सध्या मात्र पंचाईत झाली आहे. ‘व्हीआयपी गाढव’च्या निमित्ताने तिचा आमना-सामना झालाय भाऊ कदम यांच्याशी. “विनोदी भूमिका वठवणं भल्या-भल्या कलाकारांना कठीण जातं त्यात हा माझा प्रांत तर नाहीच आणि त्यात कॉमेडीचा किंग भाऊ माझ्यासमोर म्हटल्यावर माझ्यावर थोडंसं दडपण आलंच पण भाऊंनी सांभाळून घेतलं. काशी ही भूमिका माझ्यासाठी कायम स्मरणात राहावी अशीच आहे. आतापर्यंत प्रेक्षकांनी मला मॉर्डन रूपात पाहिलंय आता त्यांना गावरान ठेका पाहायला मिळेल.”

शीतल अहिररावसोबत, भाऊ कदम, विजय पाटकर आणि भारत गणेशपुरे आदी दमदार कलाकारांच्या महत्वाच्या भूमिका असणारा दादा कोंडके शैलीतला ‘व्हीआयपी गाढव’ हा विनोदी चित्रपट हास्यविस्फोट करायला सज्ज आहे. द्वयर्थी संवाद, विनोदाचं अचूक टायमिंग आणि अस्सल गावरान भाषेचा लहेजा पुन्हा एकदा सिनेरसिकांना अनुभवता येणार आहे.