‘हॉरर कॉमेडी’ चित्रपट ‘भूतीयापंती’ मध्ये ‘गणपती’ गाणे ! गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘स्त्री’ च्या यशानंतर सध्या हिंदीमध्ये बऱ्याच ‘हॉरर कॉमेडी’ चित्रपटांची निर्मिती होत आहे. मराठीमध्ये तर विनोदी चित्रपटांची लाट कधीच ओसरत नसली तरी ‘हॉरर कॉमेडी’ चित्रपटांचीसुद्धा परंपरा आहे. त्याच जातकुळीतला एक थरारक व गंमतीशीर चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय ज्याचे नाव आहे ‘भूतीयापंती’. चित्रपटाच्या नावावरून त्याच्या ‘जॉनर’ ची कल्पना आलीच असेल.

गणेशोत्सव जवळ आला आहे व ते औचित्य साधून ‘भूतीयापंती’ च्या निर्मात्यांनी चक्क गणपतीबाप्पाला आपल्या ‘हॉरर कॉमेडी’ चित्रपटात सामावून घेतलेय, एका गाण्याद्वारे. हे गाणे सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या भारदस्त आवाजात ध्वनिमुद्रित करण्यात आले आहे. ‘तुला शोधू कुठे रे मोरया, तुला पाहू कुठे रे मोरया’ असे बोल असलेल्या गाण्याचे गीतकार आहेत स्वप्नील चाफेकर ‘प्रीत’ व त्याला संगीतबद्ध केलंय अभिनय जगताप यांनी. ‘मोरया मोरया ताल हा वाजला, गर्जती दाही दिशा’ असे म्हणत गीतकाराने चपखल शब्दांमध्ये गणपती बाप्पा हे सर्वांचेच कसे लाडके दैवत आहे, हे अधोरेखित केले आहे व आनंद शिंदेंच्या आवाजाने हे गाणे अजूनच बहारदार झाले आहे. तसेच नृत्य दिग्दर्शक संतोष आंब्रे यांनी बसविलेल्या पदलालित्याने ते पडद्यावर खुलून दिसत आहे.

महत्वाचं म्हणजे आनंद शिंदे यांनी पहिल्यांदाच मराठी चित्रपटासाठी ‘गणपती’ गाणे गायले आहे. संगीतकार अभिनय जगताप यांचे संगीत दिग्दर्शन असलेला ‘सूर सपाटा’ या वर्षी प्रदर्शित होऊन गेला. तसेच त्यांनी पार्श्वसंगीत दिलेल्या ‘टकाटक’ चित्रपटाने कोटीकोटीची उड्डाणे केली व यावर्षीच्या सर्वात जास्त कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटांच्या यादीत स्थान मिळविले. आनंद शिंदे यांनी ‘टकाटक’ साठी पार्श्वगायन केले होते व त्यांची व अभिनय जगतापांची जोडी पुन्हा ‘भूतीयापंती’ चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आली आहे.

विनोद बरदाडे प्रोडक्शनच्या बॅनरखाली निर्माते विनोद बरदाडे व सहनिर्माते नरेश चव्हाण आणि यशवंत डाळ ‘भूतीयापंती’ ची निर्मिती करीत आहेत. दिग्दर्शक संचित यादव यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होणा-या या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि गीतलेखन विनय येरापले यांनी केलं आहे.