अमोल लक्ष्मण कागणे प्रस्तुत लक्ष्मण एकनाथराव कागणे निर्मित आणि शिवाजी लोटन पाटील दिग्दर्शित ‘वाजवुया बँड बाजा’ ह्या बहुचर्चित चित्रपटाची चर्चा सर्वत्र सुरू असताना प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बाब समोर आली आहे ती म्हणजे या चित्रपटाचा टिझर लवकरच म्हणजे येत्या सोमवारी सोशल मीडियावर प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे. प्रेक्षकांच्या मनात असलेली उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच चित्रपटाचा टिझर प्रदर्शित होणार असून एक महत्वपूर्ण विनोदी चित्रपट आणि त्यात घडणाऱ्या गमती-जमती आणि तीन भावांच्या लव्हस्टोरी चा धूमधडाका या चित्रपटाच्या टिझर मधून पाहायला मिळेल.

तीन भावांच्या आयुष्यातल्या गमती-जमतींवर आधारलेली ‘वाजवुया बँड बाजा’ची गमतीदार कथा संदीप नाईक यांनी लिहिली आहे  तर प्रसंगानुरूप हास्याची कारंजे उडवणारी पटकथा तसेच संवाद निशांत नाथराम धापसे यांनी लिहिली आहेत. या चित्रपटात अभिनेता मंगेश देसाई,समीर धर्माधिकारी, चिन्मय उदगीरकर, प्रीतम कांगणे, नागेश भोसले, अभिजीत चव्हाण, कांचन पगारे, रुचिरा घोरमोरे, अश्विनी खैरनार, भाग्यश्री देसाई यांनी मुख्य भूमिका वठविल्या आहेत. निसर्गरम्य असा कॅनव्हास चितारला आहे छायाचित्रकार नागराज दिवाकर यांनी. शिवाय या प्रेमकथेला खरा साज चढवलाय तो ‘वाजवूया बँड बाजा; या चित्रपटातील गाण्यांनी. विजय गटलेवार यांच्या संगीत लहरींवर गायक-आदर्श शिंदे यांच्या स्वरांनी तर चारचाँदच लावलेत. संकल-निलेश गावंड आणि कलादिग्दर्शक-संतोष समुद्रे अशी इतर श्रेयनामावली आहे. तर ‘पिकल एंटरटेनमेंट’चा या चित्रपटाच्या वितरणात खारीचा वाटा आहे.

तरुणांना आकर्षित करणारा ‘वाजवूया बँड बाजा’चा विषय प्रत्येक वयोगटातील तरुण मंडळींना आवडेल असा असून मनाने तरुण असणाऱ्यांना आपल्या गतकाळातील प्रेमाची तर युवा पिढीला आपल्या करंट अफेअरच्या आठवणींत रमायला भाग पडेल याची निर्माते अमोल कागणे आणि दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांना खात्री आहे. येत्या सोमवारी म्हणजे १७ फेब्रुवारी २०२० ला या चित्रपटाच्या टिझर मधून ही खात्री नक्कीच प्रेक्षकांच्या मनात घर करेल यांत शंकाच नाही. हा चित्रपट २०मार्चला सर्वत्र महाराष्ट्रभर प्रदर्शित होईल.