दिग्दर्शनाबरोबर अभिनयाची धुरा सांभाळत अभिनेत्री रुचिरा घोरमोरे हिने चित्रपटसृष्टीत चांगलेच नाव कमावले. रंगभूमीवर काम करत करत तिने ‘पाणी पंचायत’ सारख्या गाजलेल्या शॉर्ट फिल्म मध्ये मुख्य भूमिका साकारत प्रेक्षकांचे मन जिंकले. याशिवाय ‘बोले चुडीया’ या चित्रपटातही तिने काम केले. अभिनयाच्या जोरावर आता रुचिराने मराठी चित्रपटसृष्टीकडे तिची पावले वळवली आहेत. अभिनयाची आवड जोपासत आता ती लवकरच ‘वाजवूया बँड बाजा’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मराठी चित्रपटसृष्टीतले हे तिचे पदार्पण मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांसोबत होणार असल्याने ही कौतुकाची बाब नक्कीच ठरेल.

‘वाजवूया बँड बाजा’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेली रुचिरा या चित्रपटात अभिनेता मंगेश देसाईसह मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात ती प्रिया नावाची भूमिका साकारत असून एका नामवंत अशा पवार डॉक्टरांच्या मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात प्रियाही डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये कंपाऊंडर म्हणून काम करत असलेल्या अमितच्या म्हणजेच चित्रपटातली हुकमी एक्का मंगेश देसाईच्या प्रेमात पडते. दोघांच्या एकमेकांवर असलेल्या अतोनात प्रेमाला मात्र प्रियाच्या वडिलांचा म्हणजे पवार डॉक्टरांचा विरोध असतो. याच नकाराला होकारात मिळवण्यासाठी चित्रपटादरम्यान सुरू असलेली मजेशीर धडपड, तसेच प्रिया आणि अमितच्या लग्नाचे पुढे काय होते? त्यांना होकार मिळतो का? कसा मिळतो? या सर्वच पडलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळविण्याकरिता ‘वाजवूया बँड बाजा’ हा चित्रपट पाहायलाच हवा असा आहे.

अमोल लक्ष्मण कागणे प्रस्तुत राष्ट्रीय पुरस्कार विजेते लक्ष्मण एकनाथराव कागणे, अमोल कागणे निर्मित आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते शिवाजी लोटन पाटील दिग्दर्शित हा बहुचर्चित ‘वाजवूया बँड बाजा’ चित्रपट प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवण्यासाठी येत्या २० मार्च २०२० ला सर्वत्र महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. तीन भावांच्या आयुष्यातल्या गमती जमती आणि हास्याचा विस्फोट घडवून आणणारा हा प्रेमकथेवर आधारित असलेला हा ‘वाजवूया बँड बाजा’ चित्रपट येत्या २० मार्चला जवळच्या चित्रपटगृहात जाऊन नक्की पहा.