दहा बाय दहाची चौकट मोडणारे “दहा बाय दहा” हे लोकप्रिय नाटक सुवर्णमहोत्सवी टप्प्यावर आले आहे. नाटकाचा ५० वा प्रयोग डोंबिलीच्या सावित्रीबाई फुले नाट्यगृहात रंगणार आहे. स्वरुप रिक्रिएशन अँड मीडिया प्रा. लि. च्या सचिन नारकर, विकास पवार, आकाश पेंढारकर यांनी नाटकाची निर्मिती केली आहे.
घाडीगावकर या अतिशय साध्या आणि पारंपरिक चौकटीत जगणाऱ्या कुटुंबांची गोष्ट या नाटकात मांडण्यात आली आहे. पण हीच पारंपरिक चौकट मोडण्याची त्यांची प्रेरणा आणि धडपड हाच नाटकाचा केंद्रबिंदू आहे. कम्फर्ट झोन सोडून वेगळं काही करण्याचा, मिळवण्याचा विचार देणाऱ्या या नाटकावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं आहे. म्हणूनच या नाटकानं ५० प्रयोगांचा टप्पा गाठला आहे.
या नाटकात अभिनेते विजय पाटकर, प्रथमेश परब, सुप्रिया पाठारे, विधीशा म्हसकर, गौरव मालणकर, अमीर तडवळकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत, तर संजय जमखंडी आणि वैभव सानप यांनी लेखन, अनिकेत पाटील यांनी दिग्दर्शन केलं आहे. आशुतोष वाघमारे यांनी संगीत, विजय गोळे यांनी प्रकाश योजना, संदेश बेंद्रे यांनी नेपथ्य, हितेश पवार यांनी रंगभूषा आणि रश्मी सावंत यांनी वेशभूषा केली आहे.
आतापर्यंत झालेल्या ५० प्रयोगांचा अनुभव अतिशय आनंददायी आहे. या नाटकातून केवळ घाडीगावकर कुटुंबच नाही, तर आम्हालाही नवा विचार मिळाला आहे. आमचा आणि प्रेक्षकांचा हा प्रवास धमाल आणि उत्साहवर्धक असाच आहे. ५० प्रयोगांचा टप्पा पुढे जाऊन शंभर, पाचशे, हजार प्रयोगांचा होईल अशी खात्री आहे, अशी भावना नाटकाच्या टीमनं आणि निर्मात्यांनी व्यक्त केली