सूर नवा ध्यास नवामध्ये रंगली महेश काळे आणि तौफीक कुरेशी यांची जुगलबंदी !

कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा हा कार्यक्रम सुरु झाल्यापासूनच यातील सेलेब्रिटी गायक आपल्या सुंदर गायकीने अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकत आहेत. लोकसंगीत असो, शास्त्रीय संगीत असो वा वेस्टर्न संगीत असो या गायकांनी विविध शैलींमधील गाणी उत्तम पद्धतीने सादर करून प्रत्येक भागामध्ये कॅप्टनसना तसेच मंचावर आलेल्या विशेष अतिथींना एक आश्चर्याचा सुखद धक्काही दिला आहे. येत्या सोमवार आणि मंगळवारच्या भागामध्ये देखील असेच काहीसे घडले. या आठवड्याची थीम होती  Instrument खास. या भागामध्ये “जिम्बे” या वाद्याला भारतामध्ये नावारूपाला आणणारे तसेच आंतराष्ट्रीय पातळीवर संगीतामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेले उस्ताद अल्लाराखा यांचे सुपुत्र आणि उस्ताद झाकीर हुसेन यांचे मोठे भाऊ सुप्रसिध्द संगीतकार “श्री. तौफीक कुरेशी” यांनी हजेरी लावली. सूर नवा ध्यास नवाच्या मंचावर या भागामध्ये एकाहून एक रंगतदार आणि “वाद्य” ज्या गाण्याचा महत्वाचा भाग आहे अशी गाणी स्पर्धकांनी सादर केली. तेंव्हा बघायला विसरू नका येत्या सोमवारी आणि मंगळवारी रात्री ९.३० वा. कलर्स मराठी वाहिनीवरून प्रसारित होणारा हा खास भाग.

महेश काळे आणि तौफीक कुरेशी यांची सूर तालाची जुगलबंदी

सूर नवा ध्यास नवाच्या मंचावर या वेळेस रंगली सूर आणि तालाची खास जुगलबंदी. महेश काळे यांची गायिकी, तौफीकजींचे “जिम्बे” हे वाद्य आणि ख्यातनाम सँक्सोफोन वादक श्यामराजजी यांची जुगलबंदी सुरु झाली आणि सगळे उपस्थित मंत्रमुग्ध झाले. “अलबेला सजन आयो” यावर त्यांनी जुगलबंदी सादर करून सगळ्यांची मने जिंकली. महेश काळे आणि तौफीक कुरेशी यांना एकत्र एकाच मंचावर प्रेक्षकांना ऐकण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे सूर नवा ध्यास नवा कार्यक्रमामध्ये.

या आठवड्याच्या Instrument खास या भागामध्ये ढोलकी, तबला, बासरी अशी आणि याप्रकारची अनेक वाद्ये ज्या गाण्यांचे महत्वाचे भाग आहेत अशी गाणी स्पर्धकांनी सादर केली. ज्यामध्ये शरयू दाते हीने मला म्हणतात पुण्याची मैना हे गाणे सादर केले. तसेच शमिका भिडेने कांदे पोहे सिनेमातील गाणे सादर केले. निहिरा जोशी हिने “ओ सजना” हे गाणे गाऊन कार्यक्रमात वेगळे रंग भरले आणि सगळ्यांची मने जिंकली.

आपल्या नेहमीच्या शैलीपेक्षा वेगळी शैली निवडून आणि ती तेवढ्याच उत्तम पद्धतीने सादर करून स्पर्धकांनी आपल्या कॅप्टनसना आणि तौफीक कुरेशी यांचे मनं जिंकले. याशिवाय या आठवड्यात मानाची सुवर्ण कट्यार कुणाला मिळणार हे बघणंही उत्सुकतेचं ठरेल.

येत्या सोमवार आणि मंगळवारच्या भागात प्रेक्षकांना हा खास नजराणा मिळणार आहे. त्यासाठी बघायला विसरू नका सूर नवा ध्यास नवा रात्री ९.३० वा. कलर्स मराठीसह कलर्स मराठी HD वर.