कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ हा कार्यक्रम सुरु झाल्यापासून यातील गायकांनी आपल्या सुंदर गायकीने अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकली आणि तब्बल पाच महीने त्यांच्या निखळ, सुरेल स्वरांनी संपूर्ण महाराष्ट्राला एकत्र बांधून ठेवले. कार्यक्रमामधील गायकांनी विविध शैलींमधील गाणी उत्तम पद्धतीने सादर करून प्रत्येक भागामध्ये कॅप्टन्सची तसेच मंचावर आलेल्या विशेष अतिथींची देखील वाहवा मिळवली. या कार्यक्रमाला तसेच कार्यक्रमामधील स्पर्धकांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. २२ सुरवीरांचा सुरेल प्रवास पाच महिन्यांआधी सुरू झाला आणि या प्रवासामध्ये स्पर्धकांना बरेच काही शिकायला मिळाले आणि याच स्पर्धकांमधून कार्यक्रमाच्या मंचाला मिळाले अंतिम सहा शिलेदार रविंद्र खोमणे, स्वराली जोशी, अक्षया अय्यर, अमोल घोडके, राजू नदाफ, श्रावणी वागळे.
या स्पर्धकांमध्ये रंगला सूर नवा ध्यास नवा – स्वप्न सुरांचे स्वप्न सार्यांचे कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा. महाअंतिम सोहळ्यामध्ये रंगली गाण्याची मैफल आणि रंगले विजेतेपद जिंकण्यासाठीचे संगीत युध्द… आणि या मधूनच महाराष्ट्राला मिळाला नवीन सूर… पद्मश्री हरीहरानजी यांनी सूर नवा ध्यास नवाच्या विजेत्याच नाव घोषित केले. अक्षया अय्यरने सूर नवा ध्यास नवाची राजगायिका होण्याचा मान पटकावला. अक्षया अय्यरला कलर्स मराठीतर्फे दोन लाख रुपये, वामन हरी पेठे सन्स यांनी डिझाईन केलेली मानाची सुवर्णकटयार आणि केसरी टुर्सतर्फे सिंगापूरची टुर मिळाली. तसेच रविंद्र खोमणेला, स्वराली जोशी, अमोल घोडके, राजू नदाफ, श्रावणी वागळे या उपविजेत्यांना कलर्स मराठीतर्फे एक लाख रुपयांचा धनादेश आणि ट्रॉफी, तसेच उपविजेते, कॅप्टन्स, सूत्रसंचालक यांना केसरी टुर्सतर्फे गिफ्ट व्हाऊचर मिळाले.
“सूर नवा ध्यास नवा” कार्यक्रमामध्ये झुंझार अमोल घोडकेचा बुलंद आवाज, जिच्या ध्यानीमनी सतत असतात गाणी अशी श्रावणी वागळे, लिटल वंडर अक्षया अय्यरचे कुठलेही गाणे सहज गाण्याची कला, मराठवाड्याचे खणखणीत नाणे रविंद्र खोमणे, जिच्या आवाजाची खुमारी सर्वांपेक्षा निराळी अशी स्वराली जोशी, टीपेचा सूर आणि इंटेन्स इमोशन्सचा मिलाफ राजू नदाफ यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. कार्यक्रमामधील एका पेक्षा एक सुरेल स्पर्धकांना मागे टाकत या सहा स्पर्धकांनी अंतिम फेरीमध्ये जाण्याचा मान मिळवला. महाअंतिम सोहळ्यामध्ये अवधूत गुप्ते आणि महेश काळे यांनी त्यांच्या दमदार गाण्यांनी स्पर्धक आणि प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. महेश काळे यांनी गाण सादर करून उपस्थितांना पुन्हाएकदा भारावून टाकले.
ईतकेच नव्हे, कार्यक्रमाची रंगत वाढविण्यासाठी आणि स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी कलर्स मराठीच्या परिवारातील प्रेक्षकांचे लाडके कलाकार उपस्थित होते. सुखाच्या सरींनी हे मन बावरे, जीव झाला येडापिसा, स्वामिनी, बाळूमामाच्या नावानं चांगभलं आणि राजा रानीची गं जोडी मालिकेमधील कलाकारांनी महाअंतिम सोहळ्यामध्ये हजेरी लावली होती.