एक अनोखी चौकट मोडत स्वतःला अभिमान वाटेल असे निसर्गसंवर्धनाचे कार्य ‘दहा बाय दहा’ नाटकाच्या संपूर्ण टीमने डोंबिवली येथे नुकत्याच पार पडलेल्या सुवर्ण महोत्सवानिमित्त केले. आरेमध्ये झालेल्या वृक्षतोडीविरोधात सर्वत्र निषेध व्यक्त होत आहे. रात्रीच्या पोटात हजारो झाडांची कत्तलं होत असताना, त्याच्या निषेधार्थ ‘दहा बाय दहा’ च्या टीमनेदेखील आवाज उचलत, डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहाच्या आवारात ५० व्या यशस्वी प्रयोगानंतर रात्री वृक्षारोपण केले.
‘आम्हाला विकास हवा आहे, भकास नको’ असा संदेश त्यांनी यावेळी दिला. मध्यमवर्गीय कुटुंबाला आपलंसं करणारं आणि ‘दहा बाय दहा’ चौकटीबाहेर विचार करण्यास प्रवृत्त करणाऱ्या या धम्माल विनोदी नाटकातील संपूर्ण टीमने सुवर्ण महोत्सवी प्रयोगानिमित्त समाजासाठी आणि पर्यावरणासाठी महत्वपूर्ण घटक असलेल्या निसर्गसंवर्धनाकडे लोकांचे लक्ष वेधले.
मध्यमवर्गीय मानसिकता आणि विचारांना छेद देऊन चौकटीबाहेर येण्याचा संदेश देणारे ‘दहा बाय दहा’ हे विनोदी नाटक आणि त्यातील सर्व कलाकार प्रेक्षकांना चांगलेच पसंद पडले आहे.
स्वरूप रिक्रीएशन अँड मीडिया प्रायवेट लि. निर्मित ‘दहा बाय दहा’ हे नाटक अनिकेत पाटील यांनी दिग्दर्शित केलं असून, यामध्ये विजय पाटकरांसोबत प्रथमेश परब, सुप्रिया पाठारे आणि विदीशा म्हसकर ह्यांचा धुडगूसदेखील पहायला मिळतो. या नाटकाचं लेखन संजय जामखंडी आणि वैभव सानप यांनी केलं असून, हे नाटक वारंवार पाहिले तरी कंटाळा येणार नाही असे आहे.